जीवनसत्त्वांची कमतरता व व्यायामाचा अभाव हाडांच्या आजारांसाठी कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 11:30 AM2021-10-20T11:30:58+5:302021-10-20T11:39:37+5:30
वयाच्या ३० वर्षांपर्यंत हाडांचे आजार कमी दिसून येतात. त्यानंतर विविध त्रास सुरू होतात. रजोनिवृत्ती झालेल्या महिला व ६५ वर्षांवरील पुरुषांमध्ये हाडांचे आजार गंभीर स्वरुपाचे असतात. सध्या तरुणांमध्येही हाडांचे आजार आढळून येत आहेत.
मेहा शर्मा
नागपूर : वर्तमान काळात तरुणांमध्येही हाडांसंदर्भातील आजार वाढत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. निरोगी हाडांसाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ डाॅक्टरांनी सांगितले आहे. २० ऑक्टोबर रोजी जागतिक अस्थिराेग दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त ‘लोकमत’ने तज्ज्ञ डाॅक्टरांची मते जाणून घेतली.
महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर तर, पुरुषांमध्ये वयाच्या ६५ वर्षांनंतर अस्थिरोग वाढतात. परंतु, वर्तमान काळात तरुणांमध्येही अस्थिरोगाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यासंदर्भात शास्त्रीय आकडेवारी उपलब्ध नाही, पण दैनंदिन निरीक्षणावरून हे स्पष्ट होते, असे तज्ज्ञांनी सांगितले. मेडिकलचे माजी अधिष्ठाता व वरिष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सजल मित्रा म्हणाले, हाडांचे आरोग्य वयावर अवलंबून आहे.
वयाच्या ३० वर्षांपर्यंत हाडांचे आजार कमी दिसून येतात. त्यानंतर विविध त्रास सुरू होतात. रजोनिवृत्ती झालेल्या महिला व ६५ वर्षांवरील पुरुषांमध्ये हाडांचे आजार गंभीर स्वरुपाचे असतात. सध्या तरुणांमध्येही हाडांचे आजार आढळून येत आहेत. नियमित व्यायाम करून हाडांच्या आजारांना दूर ठेवले जाऊ शकते. स्टिरॉईड कमी प्रमाणात घेतल्यास हाडांवर वाईट परिणाम होत नाही.
डॉ. रोमील राठी यांनी जीवनसत्त्वांची कमतरता व व्यायामाचा अभाव या दोन गोष्टींना हाडांच्या आजारांसाठी कारणीभूत ठरविले. गेल्या दोन वर्षांत तरुणांमध्ये हाडांचे आजार वाढले आहेत. लॉकडाऊनमध्ये नागरिक घरीच होते. त्यांना सूर्यप्रकाश मिळत नव्हता. ते व्यायामही करीत नव्हते. त्याचा वाईट परिणाम हाडांवर झाला. महिलांनी रजोनिवृत्तीनंतर पूरक आहार घेणे अपेक्षित आहे. परंतु, नागरिकांनी स्वत:हून पूरक आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कॅल्शियम औषधे वर्षभर घेता येत नाहीत. एक किंवा दोन महिनेच या औषधांचा उपयोग करता येतो, अशी माहिती डॉ. राठी यांनी दिली.
तरुणांमधील गुडघ्याचे प्रत्येक दुखणे अस्थिरोग नसते, असे डॉ. दिलीप राठी यांनी सांगितले. अस्थिरोग असल्यास संपूर्ण शरीरात वेदना होतात. कमरेच्या खाली वेदना होतात. अस्थिरोगाचे निदान करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे आहे. पूरक आहार घेता येऊ शकतो, पण त्यामुळे जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होत नाही. अस्थिरोगावर डॉक्टरांकडून उपचार करणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सर्वांनी हे करा
१ - हाडांच्या आरोग्याची काळजी घ्या
२ - पौष्टिक आहार घ्या
३ - अधिक धूम्रपान व मद्यपान करू नका
४ - नियमित व्यायाम करा
५ - सूर्यप्रकाशात वेळ घालवा