जागतिक रानपिंगळा दिन; मानवी अज्ञानाचे पिंगळ्याच्या अस्तित्वावर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 12:21 PM2020-10-24T12:21:34+5:302020-10-24T12:23:05+5:30
Nagpur News Owl शकुन-अपशकुन, काळी विद्या, गुप्तधन या अंधश्रद्धा आणि पक्ष्यांच्या अधिवासाबाबत असलेले अज्ञान यामुळे रानपिंगळ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात आढळणाऱ्या बहुतेक प्राणी व पक्ष्यांसोबत भारतीय लोकांच्या श्रद्धा व अंधश्रद्धा जुळल्या आहेत. अशाच प्रकारच्या अंधश्रद्धेचा बळी ठरला आहे अतिशय दुर्मिळ असा रानपिंगळा म्हणजेच वन घुबड. शकुन-अपशकुन, काळी विद्या, गुप्तधन या अंधश्रद्धा आणि पक्ष्यांच्या अधिवासाबाबत असलेले अज्ञान यामुळे रानपिंगळ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पिंगळा या पक्ष्याच्या ३० प्रजातीचे भारतात अस्तित्व आहे. त्यातील एक म्हणजे रानपिंगळा किंवा वन घुबड हा होय. १८८० मध्ये पहिल्यांदा या पक्ष्याची देशात नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ११७ वषार्नंतर १९९७ साली विदेशी पक्षी संशोधक पामेला यांनी मेळघाटच्या जंगलात या दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व शोधले. सातपुडा पर्वत, मेळघाट, सह्याद्रीच्या पर्वतरांगातील तानस व गुजरातच्या काही भागात रानपिंगळ्याचे अस्तित्व आहे. तीन वषार्पूर्वी अतिशय दुर्मिळ असल्याने राज्य पक्षी म्हणून घोषित करून संवर्धन करण्याची मागणी झाली होती. मात्र ते झाले नाही.
घुबडाच्या बहुतेक प्रजाती निशाचर आहेत पण रानपिंगळा हा दिनचर आहे. साप, उंदीर, पाली, सरडे हे त्याचे खाद्य. मानवी वस्त्या, गवती कुरण व घनदाट जंगले हे त्याचे अधिवास. दुसरीकडे उंदीर मारण्यासाठी उपयोगात येणारे विषारी औषध, शेतातील पेस्टिसाईड यामुळे प्राणी मरतात आणि हेच मेलेले प्राणी खाल्ल्याने रान घुबडांच्याही जीवावर संकट येते.
दुसरीकडे रानपिंगळ्याबाबत असलेली अंधश्रद्धाही त्यांच्या संकटासाठी कारणीभूत ठरली आहे. शिवाय गुप्तधन, काळी विद्या अशा अंधश्रद्धांमुळे त्यांची शिकार केली जाते. या पक्ष्यावर संशोधन होते पण आजपर्यंत कुठलीही गणना झाली नसल्याने निश्चित आकडेवारी नाही. अशा अनेक कारणाने या दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व संकटात सापडले आहे.
सर्वात आधी शासनाने रानपिंगळ्याचे अधिवास जाहीर करावे आणि त्यावर अभ्यास करून संवर्धनाबाबत नियोजन करावे. त्यांच्या अधिवासात अनावश्यक मानवी हस्तक्षेप निषिद्ध करावा.
- यादव तरटे पाटील, सदस्य, म.रा. वनसंवर्धन समिती