जागतिक पक्षाघात दिवस : देशात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 09:42 PM2020-10-29T21:42:19+5:302020-10-29T21:43:55+5:30
World Paralysis Day , Nagpur news पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना हा आजार होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना हा आजार होतो. त्यापैकी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात. भारतात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात २० लाख लोक या आजाराने बळी पडतात. हा आजार कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतामध्ये याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. देशातील पक्षाघाताचे २० टक्के रुग्ण हे ४० वर्ष पेक्षा कमी वयाचे असतात, अशी माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने पक्षाघात विषयी जागरूकता वाढविण्यासाठी ‘वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन’ सोबत ‘इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजी’ आणि ‘नागपूर न्यूरो सोसायटी’च्यावतीने तज्ज्ञानी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
जंक फूडचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव व तणाव यामुळे भारतात तरुणामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. शिरीष हस्तक म्हणाले, जेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वाहून नेणारी रक्तवाहिनी एकतर गाठीद्वारे अवरोधित होते किंवा फुटते तेव्हा पक्षाघात होतो. ८० टक्के रुग्णामध्ये मेंदूची रक्त वाहिनी बंद होते आणि २० टक्के रुग्णांमध्ये रक्त वाहिनी फाटते. स्ट्रोकची सुरुवातीची चिन्हे ओळखणे महत्वाचे आहे. चेहरा तिरपा होणे, हातात कमजोरी येणे व आवाजात फरक पडणे हे पक्षाघाताची प्रमुख लक्षणे आहेत. चालताना अडचण येणे, शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे, दृष्टीदोष होणे, चक्कर येणे, गिळण्यास त्रास होणे, गोंधळ होणे इत्यादी पक्षाघाताची इतर लक्षणे आहेत.
५० टक्के मृत्यू रोखता येतो
इंडियन अॅकॅडमी न्यूरोलॉजीचे माझी अध्यक्ष व स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. सुभाष कौल म्हणाले, लवकर निदान आणि त्वरित उपचारामुळे ५० टक्के रुग्णात मृत्यू व अपंगत्व रोखता येऊ शकतो. एकदा पक्षाघात झाल्यानंतर चार पैकी एकाला परत पक्षाघात येऊ शकतो, म्हणूनच त्या व्यक्तीने आजीवन औषधे घ्यावीत व जीवनशैलीत बदल करण्यावर भर द्यावा. पुनर्वसन तज्ञ डॉ. अभिषेक श्रीवासत्व म्हणाले, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, वायू प्रदूषण आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमी हे ९० टक्के रुग्णामध्ये पक्षाघाता चे कारण असते.