जागतिक पक्षाघात दिन; देशात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 07:10 AM2021-10-29T07:10:00+5:302021-10-29T07:10:01+5:30
Nagpur News जगाच्या तुलनेत भारतामध्ये पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे, ही चिंतेची बाब असल्याची माहिती ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुप’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
नागपूर : पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना पक्षाघात होतो. त्यापैकी ६० लाख लोक दगावतात. भारतात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात २० लाख लोक या आजाराला बळी पडतात. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतामध्ये पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे, ही चिंतेची बाब असल्याची माहिती ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुप’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
२९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पक्षाघात दिन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येवर त्यांनी मेंदूरोग तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डॉ. मेश्राम म्हणाले, पक्षाघातामुळे होणाऱ्या मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात. भारतात पक्षाघाताचे २० टक्के रुग्ण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. जंक फूड, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, अति ताण आदी कारणांमुळे तरुणांमध्ये पक्षाघाताचे प्रमाण वाढले आहे.
-८० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी होते बंद
जेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वाहून नेणारी रक्तवाहिनीत गुठळी निर्माण होते किंवा ती फुटते तेव्हा पक्षाघात होतो. ८० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी बंद होते आणि २० टक्के रुग्णामध्ये रक्तवाहिनी फाटते, असे इंडियन ॲकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या स्ट्रोक विभागाचे अध्यक्ष डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी सांगितले.
-स्ट्रोकची सुरुवातीची चिन्हे ओळखणे आवश्यक
डॉ. प्रसाद म्हणाले, पक्षाघात म्हणजे ‘स्ट्रोक’ची सुरुवातीची चिन्हे ओळखणे आवश्यक आहे. यात चेहरा वाकडा होणे, हातात कमजोरी येणे आणि आवाजात फरक पडणे ही पक्षाघाताची प्रमुख लक्षणे आहेत. चालताना अडचण येणे, शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे, दृष्टिदोष होणे, चक्कर येणे, गिळण्यास त्रास होणे, गोंधळ होणे हीदेखील लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसून येतात. अचानक उद्भवणारे कोणतेही लक्षण स्ट्रोकमुळे असू शकते, असेही ते म्हणाले.
-पक्षाघाताच्या उपचारात प्रगती
पक्षाघाताच्या उपचारात बऱ्याच नवीन प्रगती झाल्या आहेत. लवकर निदान आणि त्वरित उपचार यामुळे ५० टक्के रुग्णांत मृत्यू आणि अपंगत्व कमी होते. पक्षाघातग्रस्त व्यक्ती तातडीने रुग्णालयात पोहोचल्यास त्याला उत्तम उपचार दिले जाऊ शकतात आणि अल्पावधीतच तो बरा होऊ शकतो, असे इंडियन ॲकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे भावी अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या यांनी सांगितले.
- स्ट्रोकविषयी चुकीच्या धारणा
इंडियन ॲकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या स्ट्रोक विभागाचे समन्वयक डॉ. सुनील नारायण म्हणाले, स्ट्रोकविषयी अज्ञान आणि चुकीच्या धारणा आहेत. काही लोट स्ट्रोकच्या रुग्णाला केरोसिन देतात. त्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. एकदा पक्षाघात झाल्यानंतर चारपैकी एकाला परत पक्षाघात येऊ शकतो, म्हणूनच त्या व्यक्तीने आजीवन औषधे घ्यावीत आणि जीवनशैलीत बदल करण्यावर भर द्यावा.
-९० टक्के रुग्णांमध्ये पक्षाघाताचे हे ठरतेय कारण
डॉ. निर्मल सूर्या म्हणाले, उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉल, तणाव, चुकीचा आहार, मद्यपान व मादक पदार्थांचा वापर, हृदयविकार, वायुप्रदूषण आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमी हे ९० टक्के रुग्णांमध्ये पक्षाघाताचे कारण ठरते. स्ट्रोकच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना अपंगत्व येते.