जागतिक पक्षाघात दिन; चाळिशीत वाढतोय पक्षाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:42 AM2018-10-29T09:42:40+5:302018-10-29T09:45:21+5:30
वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण आता ४० ते ५० वयोगटांतील व्यक्तींमध्ये झपाट्याने वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण आता ४० ते ५० वयोगटांतील व्यक्तींमध्ये झपाट्याने वाढत आहे. धक्कादायक म्हणजे, अलीकडे २५ ते ३५ वयोटांतील तरुणांमध्येही हा आजार दिसून येत आहे. उच्च रक्तदाब, अपुरी झोप व तणाव, मद्यपान व धूम्रपानाची सवय, आहाराच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, मधुमेह व व्यायामाच्या अभावामुळे पक्षाघात वाढीस लागला आहे. पक्षाघाताच्या झटक्यानंतरचे पुढील चार ते सहा तास महत्त्वाचे असतात. परंतु या ‘गोल्डन अवर’मध्ये १०० मधून केवळ दोन-तीन रुग्णच उपचारासाठी येत असल्याने हे अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण ठरत असल्याची माहिती वोक्हार्ट हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. सतीश लाहोटी यांनी दिली.
२९ आॅक्टोबर हा दिवस ‘जागतिक पक्षाघात दिन’ म्हणून पाळला जातो, त्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
डॉ. लाहोटी म्हणाले, शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक नियंत्रण जाणे याला पक्षाघात, ‘पॅरालिसिस’, लकवा किंवा ‘स्ट्रोक’ असेही म्हणतात. मेंदूतील किंवा मज्जातंतूमधील पेशींनी अचानक काम करणे बंद केल्यामुळे पॅरालिसीस होतो. त्यामुळे शरीराच्या काही विशिष्ट अवयवांवर नियंत्रण ठेवता येत नाही. स्वत:च्या इच्छेप्रमाणे हात किंवा पाय हलवता येत नाही. या आजाराबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अनेकांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, जन्मभर अपंगत्व किंवा रुग्ण मृत्यूलाही सामोर जातो.
पक्षाघाताची लक्षणे दिसताच उपचार घ्या
तोंड वाकडे होणे, पायांमध्ये कमजोरी येणे, तोल जाणे, चालताना त्रास होणे, बोलण्यात फरक पडणे, अंधुक दिसणे ही पक्षाघाताची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे आवश्यक आहे. तत्काळ उपचार घेतल्यास मृत्यू व अपंगत्व टाळता येते. वयाची ६५ वर्षे ओलांडलेल्यांना याचा सर्वाधिक धोका संभावतो. परंतु अलीकडे वयाच्या ४०मध्ये हा आजार वाढल्याने या वयाच्या प्रत्येक व्यक्तीने डॉक्टरांकडून तशी तपासणी करून घेणे आवश्यक ठरते. आनुवंशिकता, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदय विकार, हृदयाचे अनियमित ठोके, हृदयविकाराचा सौम्य झटका किंवा हृदयाघात, मधुमेह, लठ्ठपणा, झोपेदरम्यान अनियमित श्वासोच्छवास, ३५ वर्षाखालील धूम्रपान करणाºया महिलांद्वारे गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन, कामाचा ताण व कामाचे अनियमित स्वरूप, स्पर्धात्मक वातावरण, पुरेशा झोपेचा अभाव, पॅकेटमधील खाद्य पदार्थांचा वाढता वापर आदी कारणांमुळे पक्षाघात होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पक्षाघाताला नियंत्रणात ठेवता येते
रक्तदाबावर नियंत्रण, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, धूम्रपान-मद्यपान टाळल्यास, नियमित व्यायाम केल्यास व ताण-तणावाला दूर ठेवल्यास पक्षाघाताला वेळीच नियंत्रणात ठेवता येते.
-डॉ. सतीश लाहोटी
इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट