जागतिक पक्षाघात दिन : दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात : चंद्रशेखर मेश्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 08:15 PM2018-10-29T20:15:19+5:302018-10-29T20:20:36+5:30
भारतात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात साधारण २० लाख लोकांना पक्षाघात होतो. यातील सात लाख लोकांचा मृत्यू होतो. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्या देशात ज्यांना पक्षाघात होतो, त्यापैकी २० टक्के रुग्ण हे ४० पेक्षा कमी वयोगटातील असतात, अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात साधारण २० लाख लोकांना पक्षाघात होतो. यातील सात लाख लोकांचा मृत्यू होतो. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्या देशात ज्यांना पक्षाघात होतो, त्यापैकी २० टक्के रुग्ण हे ४० पेक्षा कमी वयोगटातील असतात, अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
जागतिक पक्षाघात दिनाच्यानिमित्ताने डॉ. मेश्राम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जागतिक पक्षाघात संघटनेचे अध्यक्ष डॉ. मायकल ब्रेनीन यांच्यानुसार जगात दरवर्षी आठ कोटी लोकांना पक्षाघात होतो. त्यापैकी पाच कोटी लोकांना कायम स्वरूपाचे अपंगत्व येते. यामुळे पक्षाघात झाल्यानंतर आयुष्य किती चांगले करता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मृत्यू व अपंगत्व येण्यामध्ये पक्षाघात हे दुसरे कारण ठरले आहे. जगात दर दोन सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ७० लाख लोकांना पक्षाघात होतो. आणि त्यापैकी सात लाख लोक बळी पडतात. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात.
तरुणांत पक्षाघाताचे १५ टक्के प्रमाण
‘सेरेब्रल विनस थॅम्ब्रोसीस’मुळे पक्षाघाताचे प्रमाण तरुणांमध्ये साधारण १५ टक्के आहे. पक्षाघात झालेले ३० टक्के लोक मृत्युमुखी पडतात, तर ३० टक्के लोकांमध्ये अपंगत्व येते. जंकफूड खाणे, मद्यपान करणे, व्यायाम न करणे, तणावात राहणे, यामुळे भारतात पक्षाघाताचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले.
उच्च रक्तदाबामुळे वाढते पक्षाघाताची शक्यता
९० टक्के लोकांमध्ये पक्षाघात हा उच्च रक्तदाबामुळे होतो. धूम्रपान, मधुमेह, उच्चरक्तदाब, मद्यपान, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, हृदयविकार, चुकीचा आहार, जीवनसत्व बी-१२ची कमी, आणि प्रदूषण पक्षाघाताला कारणीभूत ठरते. ज्यांना रक्तदाब जास्त आहे त्यांची चार ते सहा पटीने पक्षाघाताची शक्यता वाढते.
पक्षाघाताच्या ८० टक्के रुग्णांमध्ये रक्तवाहिनी बंद होते
डॉ. मेश्राम म्हणाले, पक्षाघातामध्ये साधारण ८० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी बंद होते व मेंदूच्या काही भागात रक्तप्रवाह आणि आॅक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मेंदूच्या पेशी निष्क्रिय होतात. तर २० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची रक्तवाहिनी फाटते, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रेन हॅमरेज’ असे म्हणतात.