जागतिक पार्किन्सन दिन; ६५ वर्षांवरील १०० रुग्णांमध्ये एक पार्किन्सनचा रुग्ण

By सुमेध वाघमार | Published: April 11, 2023 08:00 AM2023-04-11T08:00:00+5:302023-04-11T08:00:02+5:30

Nagpur News भारतात ६५ वर्षांवरील १०० लोकांमध्ये ‘पार्किन्सन’ (कंपवात) या रोगाचा एक रुग्ण आढळून येतो. अलीकडच्या काळात तरुण वयातही हा आजार दिसून येऊ लागला आहे.

World Parkinson's Day; One in 100 patients over the age of 65 has Parkinson's |  जागतिक पार्किन्सन दिन; ६५ वर्षांवरील १०० रुग्णांमध्ये एक पार्किन्सनचा रुग्ण

 जागतिक पार्किन्सन दिन; ६५ वर्षांवरील १०० रुग्णांमध्ये एक पार्किन्सनचा रुग्ण

googlenewsNext

नागपूर : ‘पार्किन्सन’ (कंपवात) हा एक मेंदूचा रोग आहे. आपल्या शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील द्रव्य ‘निग्रा सेल्स’मधील ‘डोपेमाईन’ कमी झाल्याने हा रोग होतो. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर प्रभाव टाकतो. भारतात ६५ वर्षांवरील १०० लोकांमध्ये या रोगाचा एक रुग्ण आढळून येतो. अलीकडच्या काळात तरुण वयातही हा आजार दिसून येऊ लागला आहे. याचे प्रमाण फार कमी आहे, आणि कारणेही वेगळी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- दहा वर्षांनंतर पार्किन्सनचे रुग्ण दुप्पट

जगात सुमारे ९० लाख रुग्णांना या रोगाने ग्रासले आहे. आयुर्मान वाढत असल्यामुळे या आजाराचे रुग्ण वाढत आहे. आपल्या देशात या रोगाचे ८ ते ९ लाख रुग्ण आढळून येतात. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषामध्ये याचे प्रमाण दीडपटीने अधिक आहे.

- २५ टक्के निदान चुकीचे

पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखली जात नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णाचे निदान चुकीचे होते. दर्जेदार न्यूरोलॉजिकल केअर आणि उपचारामुळे जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्न करता येतो. हा रोग पूर्णत: बरा होत नाही, परंतु योग्य औषधाने नियंत्रणात आणता येतो.

- पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षणे म्हणजे कंपन-डॉ. मेश्राम 

न्यूरो फिजिशियन डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. हा रोग शरीराच्या एका बाजूला सुरू होतो आणि नंतर हळूहळू पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. यात हाथ, पाय कडक होतात. पाठीचा कणा वाकतो. चालण्यामध्ये अडचण होते. अचानक खाली पाडण्याचे धोका निर्माण होतो. लिहिताना अक्षरांचा आकार लहान होतो, अक्षर वेडेवाकडे होतात. स्वाक्षरीमध्ये बदल होतो. तोंडातून लाळ सांडते. वेदना आणि पोटाचे विकार, बद्धकोष्ट्पणा वाढते. चिंता आणि नैराश्य आल्याने जीवनाची गुणवत्ता कमी होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचार महत्त्वाचे ठरतात.

- ८० टक्के रुग्णांवर औषधोपचार शक्य - डॉ. अग्रवाल 

न्यूरो सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल म्हणाले, जवळपास ८० टक्के रुग्णांचे पार्किन्सन औषधोपचाराने नियंत्रणात आणणे शक्य आहे. परंतु जे रुग्ण उपचार करूनही नियंत्रणाबाहेर राहतात, रोजचे दैनंदिन कार्यही करणे त्यांना अवघड जाते व तरुण आहेत अशा रुग्णांना ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ शस्त्रक्रिया फायद्याची ठरते. यात हृदयात जसा पेसमेकर बसविला जातो, तसा पेसमेकर मेंदूत बसविला जातो. आणि हातात त्याचे ‘रिमोट’ असते. गरजेनुसार रिमोटच्या मदतीने ‘पॉवर’ वाढविता येतो. जसे चालायचे असेल तसे त्याचा ‘पॉवर’ वाढवायचा आणि झोपायचे असेल तर तो कमी करायचा.

- ही आहेत लक्षणे

:: शरीरात कंपन सुटणे

:: सर्वच हालचाली मंदावणे

:: लिहिण्यात अडचणी येणे

:: बोलण्यात फरक पडणे

:: चालताना सुरुवातीला अडचण येणे आणि चालायला लागल्यास धावायला लागल्यासारखे चालणे

:: चालताना तोल जाणे, हातपायाला कडकपणा आदी या रोगाची लक्षणे दिसून येतात.

Web Title: World Parkinson's Day; One in 100 patients over the age of 65 has Parkinson's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य