जागतिक पार्किन्सन दिन : अनेक तरुणांमध्येही दिसून येतो कंपवात, 'ही' आहेत लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 12:37 PM2022-04-11T12:37:42+5:302022-04-11T12:38:54+5:30
पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. हा रोग शरीराच्या एका बाजूला सुरु होतो आणि नंतर हहूहळू पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो.
नागपूर : ‘पार्किन्सन’ (कंपवात) हा एक मेंदूचा रोग आहे. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर प्रभाव टाकतो. भारतात ६५ वर्षांवरील १०० लोकांमध्ये या रोगाचा एक रुग्ण आढळून येतो. परंतु हा रोग वयोवृद्धांनाच होतो असे नाही, ४० वयोगटाखालील तरुणांमध्येही हा रोग दिसून येतो, अशी माहिती, ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी’चे विश्वस्त व प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
११ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पार्किन्सन’ दिवस म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मेश्राम म्हणाले, आपल्या शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील द्रव्य ‘निग्रा सेल्स’मधील ‘डोपेमाईन’ कमी झाल्याने हा रोग होतो. यात सूचना देण्याचे तंत्र पूर्णत: गडबडते. अलीकडच्या काळात तरुण वयातही हा आजार दिसून येऊ लागला आहे. याचे प्रमाण फार कमी आहे, आणि कारणेही वेगळी आहेत.
-दहा वर्षांनंतर पार्किन्सनचे रुग्ण दुप्पट
डॉ. मेश्राम म्हणाले, जगात सुमारे ९० लाख रुग्णांना या रोगाने ग्रासले आहे. आयुर्मान वाढत असल्यामुळे या आजाराचे रुग्ण वाढत आहे. आपल्या देशात या रोगाचे ८ ते ९ लाख रुग्ण आढळून येतात. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण दीडपटीने अधिक आहे.
-हा रोग एका बाजूने सुरू होऊन, पुढे संपूर्ण शरीरावर प्रभाव पाडतो
पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. हा रोग शरीराच्या एका बाजूला सुरु होतो आणि नंतर हहूहळू पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. यात हात, पाय कडक होतात. पाठीचा कणा वाकतो. चालण्यामध्ये अडचण होते. अचानक खाली पडण्याचा धोका निर्माण होतो. लिहिताना अक्षरांचा आकार लहान होतो, अक्षर वेडेवाकडे होतात. स्वाक्षरीमध्ये बदल होतो . तोंडातून लाळ सांडते. वेदना आणि पोटाचे विकार, बद्धकोष्ठपणा वाढतो. चिंता आणि नैराश्य आल्याने जीवनाची गुणवत्ता कमी होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचार महत्त्वाचे ठरतात, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.
-२५ टक्के निदान चुकीचे
पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखली जात नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णाचे निदान चुकीचे होते. दर्जेदार न्यूरोलॉजिकल केअर आणि उपचारामुळे जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्न करता येतो. हा रोग पूर्णत: बरा होत नाही, परंतु योग्य औषधाने नियंत्रणात आणता येतो.
-ही आहेत लक्षणे
:: शरीरात कंपन सुटणे.
:: सर्वच हालचाली मंदावणे
:: लिहिण्यात अडचणी येणे
:: बाेलण्यात फरक पडणे
:: चालताना सुरुवातीला अडचण येणे आणि चालायला लागल्यास धावायला लागल्यासारखे चालणे
:: चालताना तोल जाणे, हातपायाला कडकपणा आदी या रोगाची लक्षणे दिसून येतात.