बुद्ध जयंतीनिमित्त नागपुरात जागतिक शांती परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:38 PM2018-05-10T12:38:58+5:302018-05-10T12:39:08+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह आणि दीक्षाभूमी येथे आयोजित या परिषदेत विविध देशांमधील बौद्ध भिक्खू आणि विचारवंत शांततेवर मंथन करतील.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंबंधात माहिती दिली. १९ मे रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे या परिषदेचा उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे प्रमुख अतिथी राहतील.
दोन दिवसीय या परिषदेत महाबोधी सोसायटी श्रीलंकाचे अध्यक्ष बानागल उपत्तीस्स नायक थेरो, वारसानबोधी (बांगलादेश), वाई पुनाला (म्यानमार), डॉ. पोरनी चाईपिनीयापांग (थायलंड), भदंत सदानंद महास्थवीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रा. सुखदेव थोरात, संतोष दास (इंग्लंड), मिथीरीनी चौधरी (बांगलादेश), राजकन्या सौरमा किरतारका (कंबोडिया), राजकुमार थानोरा नॉर्डम (कंबोडिया), राजकुमारी मारीया अमोर (फिलिपाईन्स) आदी विचार व्यक्त करतील.
राहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी विश्वशांती पदयात्रा
१९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता राहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी येथे विश्वशांती पदयात्रा काढण्यात येईल. यानंतर दीक्षाभूमीवर दोन्ही दिवस कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. अंगुलीमाल हे नाटक सादर केले जाईल.