विश्वशांती पतसंस्था घोटाळा; अध्यक्ष, संचालकांनीच बुडवली पतसंस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 10:31 AM2020-03-03T10:31:57+5:302020-03-03T10:34:25+5:30
बालाजी नगरातील विश्वशांती नागरी सहकारी पतसंस्थेला अध्यक्ष व संचालकांनीच बुडवल्याचा अहवाल प्राधिकृत अंकेक्षकाने दिला आहे.
सोपान पांढरीपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालाजी नगरातील विश्वशांती नागरी सहकारी पतसंस्थेला अध्यक्ष व संचालकांनीच बुडवल्याचा अहवाल प्राधिकृत अंकेक्षकाने दिल्यानंतर आता त्यांची आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार निबंधक राजेंद्र कौसडीकर यांनी अॅड. हेमंत ताजने यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
लोकमतजवळील कागदपत्रांनुसार अॅड ताजने यांना एकूण ८ घोटाळ्यांची चौकशी करून विश्वशांती पतसंस्थेचे अध्यक्ष गुंडेराव मोहोड व इतर संचालक यांच्याकडून किती नुकसान भरपाई वसूल करायची आहे ते निश्चित करायचे आहे. संपर्क केला असता ही चौकशी पुढील दीड महिन्यात संपेल, असे अॅड. ताजने यांनी लोकमतला सांगितले.
नागमित्र सहकारी पतसंस्थेत ठेवी
विश्वशांती पतसंस्थेच्या ३१.३.२०१७ ताळेबंदानुसार नागमित्र सहकारी पतसंस्थेत ७.६४ लाखाच्या दोन ठेवी दिल्या. या ठेवी पूर्वी बुलडाणा अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीत होत्या. त्या नागमित्र पतसंस्थेत स्थानांतरित करताना, सहकार खात्याची परवानगी घेतली नाही. नागमित्र पतसंस्था डुबल्यानंतर या ठेवीही डुबल्या त्यामुळे ही रक्कम व्याजासह अध्यक्ष व संचालकांकडून वसूल करावी असे अहवालात म्हटले आहे.
वकील फीचा घोळ १.३१ लाखाचा
मजेची बाब म्हणजे नागमित्रमधील ७.६४ लाख वसूल करण्यासाठी विश्वशांती पतसंस्थेने अॅड. पंकज तिडके यांची नेमणूक केली व त्यांना १६,७७५ वकील फी व १५ टक्के कमिशनपोटी १,१४,६७५ अदा केले. एवढे करूनही नागमित्रकडील रक्कम वसूल झाली नाही त्यामुळे ही सर्व रक्कम अध्यक्ष व संचालकांकडून वसुली असे अहवालात म्हटले आहे.
नवोदय बँकेतील १.०५ कोटी व झाम बिल्डर्स
विश्वशांती पतसंस्थेच्या ३१ मार्च २०१७ च्या अहवालात संस्थेत २५ लाखाच्या तीन व १५ लाखाच्या दोन अशा पाच ठेवीत १.०५ कोटी नवोदय अर्बन बँकेत ठेवले. परंतु संस्थेजवळ या ठेवींची कुठलीही पावती विश्वशांतीजवळ नाही. त्यामुळे या ठेवी किती मुदतीकरता होत्या ते कळत नाही. नवोदय बँक बुडल्यामुळे या घोटाळ्यातील अध्यक्ष व संचालक दोषी असून त्यांच्याकडून १.०५ कोटी व्याजासह वसूल करावे, असे अहवालात म्हटले आहे.
झाम बिल्डर्सकडून १,७३ कोटीची मालमत्ता खरेदी
नवोदय बँकेतील वरील पाच ठेवी वसूल करण्यासाठी विश्वशांती पतसंस्थेने नवोदयचे कर्जदार झाम बिल्डर्स यांचेकडून बेसा/बेलतरोडत १.७३ कोटीची मालमत्ता खरेदी केली. यात प्रत्येकी २९.३५ लाखाचे दोन फ्लॅट व २९.४० लाख ते ४५.२२ लाखांची ४ दुकाने यांचा समावेश आहे. हा सर्व व्यवहार विश्वशांतीने सहकार खात्याची परवानगी न घेता केला आहे. शिवाय तो संस्थेच्या उद्दिष्टांशी विसंगत आहे. शिवाय ही मालमत्ता संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे. त्यामुळे ही पूर्ण रक्कम व्याजासह अध्यक्ष व संचालकाकडून वसूल करावी असे अहवालात म्हटले आहे.
याबाबत संपर्क केला असता विश्वशांती पतसंस्थेचे अध्यक्ष गुंडेराव मोहोड यांनी हे घोटाळे झाल्याचे व संचालकांची आर्थिक जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे मान्य केले. जबाबदारी निश्चित झाल्यावर रक्कम भरणार का, या प्रश्नावर मोहोड यांनी उत्तर टाळले.