जागतिक शांतता दिन; पाकिस्तानी लोकांनाही शांतता हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:42 AM2019-09-21T10:42:13+5:302019-09-21T10:42:51+5:30
पाकिस्तानी लोकांमध्ये भारत आणि येथील लोकांबद्दल प्रचंड प्रेम व आपुलकी आहे. या भेटीने गैरसमज दूर झाले. माणूस म्हणून त्यांनाही संघर्ष नको, शांतताच हवी आहे.
आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तानबद्दल आपण बरेच काही ऐकले आणि वाचले आहे. पाकिस्तानची धर्मांधता, तेथील लोकांचा क्रूरपणा, त्यांची भारत आणि भारतीय लोकांबद्दल असलेली शत्रुता इत्यादी. पण खरच ही वास्तविकता आहे काय ? तर याचे उत्तर नाही असे द्यावे लागले. एक नव्हे दोनदा पाकिस्तानचा दौरा करून आलेले डॉ. प्रदीप आगलावे यांना वेगळाच अनुभव आला. पाकिस्तानी लोकांमध्ये भारत आणि येथील लोकांबद्दल प्रचंड प्रेम व आपुलकी आहे. या भेटीने गैरसमज दूर झाले. माणूस म्हणून त्यांनाही संघर्ष नको, शांतताच हवी आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी प्रमुख आणि विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे यांनी पाकिस्तानला दोन वेळा भेट दिली आहे. पहिल्यांदा १४ एप्रिल २००७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाकिस्तानला आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी ते गेले होते. त्यात बीजभाषण करण्याचा सन्मान त्यांना मिळाला होता. तर दोन महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा ते पाकिस्तानला गेले. १० जुलै २०१९ रोजी ‘अल्पसंख्यांकाची भूमिका आणि शांतता’ या विषयावर पाकिस्तानच्या कराची शहरात आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली होती. त्यासाठीही डॉ. प्रदीप आगलावे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या भेटीत त्यांनी विविध लोकांशी संवाद साधला.
यासंदर्भात त्यांना आणि तेथील अनुभवाबाबत बोलते केले असता ‘‘पाकिस्तानला मी जाणार असल्याची बातमी मित्रांना कळली तेव्हा अनेकांनी शंका व्यक्त केली. पाकिस्तानला जायची भीती वाटत नाही का, असे विचारले.
मी शांतपणे उत्तर दिले. मी पाकिस्तानात पाच दिवस राहिलो. परंतु मला परकेपणा जाणवला नाही. तेथील मुस्लीम लोकांनी अतिशय चांगली वागणूक दिली. त्यांचे आतिथ्य आणि त्यांच्या मनमिळावू स्वभावाची आठवण आजही ताजी आहे. मुस्लीम लोक हे इतर धर्मियांचा द्वेष करतात असे अनेकदा आपण ऐकले आहे. परंतु असा अनुभव मला आणि आमच्या इतर मित्रांना आला नाही.’’
पाकिस्तानात फिरताना आपण भारतातच आहोत असे वाटले. कारण त्या लोकांची रहनसहन भारतीयच आहे. त्यांची भाषा देखील आपली हिंदीच आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद करतांना कुठेच अडचण आली नाही. पाकिस्तानी लोकांना भारतीय लेकांचे आणि भारताचे अजूनही आकर्षण आहे. आपल्याकडील हिंदी चित्रपट तेथील लोकांना फार आवडतात. आपल्या हिंदी चित्रपटातील हिरो-हिरोईनबद्दल त्यांना बरीच माहिती आहे.
पाकिस्तान आणि तेथील लोकांबद्दल मनात जी प्रतिमा आहे ती किती चुकीची आहे, याची खात्री मला पटली. तेथील लोकांना देखील संघर्ष नको आहे. त्यांना भारतात पर्यटनासाठी यायला आवडते. परंतु दोन्ही देशातील राजकीय परिस्थिती मात्र अनुकूल नाही, याचे त्यांना वाईट वाटते.
कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागताची पद्धत नाही
आपल्याकडे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अध्यक्ष, आणि इतर लोकांचे स्वागत करण्याची पद्धत आहे. अनेकदा व्यासपीठावर मोठ्या प्रमाणावर पाहुणे असतात आणि स्वागतामध्ये बराच वेळ निघून जातो. त्यामुळे कार्यक्रम कंटाळवाणा वाटू लागतो. हा अनुभव आहे. पाकिस्तानमध्ये ही पद्धत नाही. कार्यक्रमाच्या संदर्भात एक बाब प्रामुख्याने लक्षात आली ती म्हणजे कुणाचेही स्वागत केले जात नाही. आंतरराष्ट्रीय परिषदेतदेखील कुठेही हार-गुच्छ नाही, असे डॉ. आगलावे यांनी सांगितले.
भाषेची अडचण नाही
जगातील कुठल्याही देशात गेले तर सर्वात महत्त्वाची अडचण भाषा हीच ठरते. परंतु भारतीय लोकांना पाकिस्तानमध्ये भाषेची अडचण नाही. कारण पाकिस्तानमध्ये बोलली जाणारी उर्दू भाषा म्हणजे आपली हिंदी भाषाच होय. तेथील सर्वच लोक ऊर्दू बोलतात. ऊर्दू ही भारतीय भाषा आहे. फरक केवळ लिपीमध्ये आहे. आपली नागरी लिपी तर त्यांची उर्दू लिपी आहे. पाकिस्तानमध्ये कुठेही जा सर्वत्र आपली हिंदी भाषा बोलली जाते. भारतीयांसाठी भाषेचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे आपण भारतातच असल्यासारखे वाटते.