कल भी आज भी कल भी, इन यादों का सफ़र तो रुके न कभी.. आज जागतिक रेडिओ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:35 PM2023-02-13T15:35:01+5:302023-02-13T15:41:18+5:30
अजून आहे का कुणाकडे ‘रेट्रो’ काळाचे स्मरण करून देणारा रेडिओ ?
नागपूर : 'नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे आणि बारा सेकंद झालेले आहेत. लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हे क्षण आठवतात ना, रेडिओने इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल केल्यात की हे आजचं आयुष्य त्याने कळत-नकळत केलेल्या संस्काराचं फलित म्हटल्यास अतिशयोक्ती नसावी. निवेदकांचे, निवेदिकांचे आवाज तर इतके नसानसात भिनलेत की आजही 'बहनो और भाईयो..' वाला अमिन सयानी, विविध भारतीच्या कार्यक्रमातील ते संवाद कानावर तरळून जातात.
आज रेडिओ कालबाह्य झाला. छे. तो फक्त नव्या रुपात अवतरला आहे. तो अनेकांच्या घरात नाही, पण तो मनात नक्कीच आहे. आताची तरुणाई मात्र ‘एफएम’वेडी आहे. जमाना बदल गया..असं कितीही म्हणा पण, पूर्वीपासून रेडिओच्या आवाजाचे जे गारूड मनावर चढलंय ना..बस्स. ते उतरणारे नाही. नागपूरकरही रेडिओचे असेच दिवाने आहेत.
आजही रेट्रो काळातील जुन्या फिल्मी गाण्यांसाठी म्हणून रेडिओ ओळखला जातो आणि त्याचमुळे रेडिओ म्हणजे आकाशवाणी, हेच समीकरण ठरलेले आहे. आज मोबाईल, पिसी, लॅपटॅापमध्ये हजारो नवी जुनी गाणी आहेत, ऐकायला सुश्राव्य हेडफोन्स आहेत, कुठेही खरखर नाही, व्यत्यय नाही पण जी गोडी रेडिओच्या आवाजात होती, ज्या गाण्यासाठी आतुरतेने वाट बघितली जायची ती ओढ नाहीये. हा खऱ्या अर्थानं खूप काही दौलत बहाल करुन, बाजूला झालेला, विस्मरणात गेलेला फार जवळचा मित्र आहे. किती जणांना याची आठवण येत असेल, किती जणांना काहीतरी मागे सुटल्याची जाणीव होत असेल माहीत नाही.
रेडिओ आता विस्मरणात गेला आहे. कारण, तंत्रज्ञान जसजसे अपडेट होत गेले, तसतसे टीव्ही, ट्रंक कॉल, टेलिफोनचे चित्र पालटले अगदी तसेच रेडिओचेही. आता रेडिओचा आकार सूक्ष्म झाला आणि तो मोबाइल एफएम, इंटरनेट रेडिओ, हॅण्डवॉच, स्मार्टवॉच, स्मार्टपेन एवढेच नव्हे तर चष्मा वा गॉगलवरही अवतरला आहे. तरी ‘आपको अपने की शिफारिश पर सुनते है ये प्यार भरा नगमा’ची गोडी आजही कायम आहे, एवढेच! काही गोष्टी कधीच बदलत नसतात, ते असे!
आवाज कुणाचा? ‘एफएम’वरील आरजेंचा
एफएमचे फॅड आता जास्त आहे. तरुणाई तर ‘एफएम’ची अक्षरश: दिवानी बनलेली आहे. आरजे तरुणाईला तरुणाईच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन खिळवून ठेवतात. पूर्वी आरजे म्हणजेच निवेदक आपल्याला केवळ आवाजाने लक्षात राहायचे. आताचे आरजे आवाज, वक्तृत्व, संभाषणचातुर्य अशा गुणांनी संपन्न आहेत. काही अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.