जागतिक रेडिओ दिवस; क्रिकेटची कॉमेंट्री असो वा आवडती फिल्मी गाणी, आपला ‘रेडू’ आठवतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 07:00 AM2022-02-13T07:00:00+5:302022-02-13T07:00:12+5:30

Nagpur News भारतात आजही रेट्रो काळातील जुन्या फिल्मी गाण्यांसाठी म्हणून रेडिओ ओळखला जातो. रेडिओ म्हणजे आकाशवाणी, हेच समीकरण ठरलेले आहे.

World Radio Day; Whether it's a cricket commentary or a favorite movie song, do you remember 'Redu'? |  जागतिक रेडिओ दिवस; क्रिकेटची कॉमेंट्री असो वा आवडती फिल्मी गाणी, आपला ‘रेडू’ आठवतो का?

 जागतिक रेडिओ दिवस; क्रिकेटची कॉमेंट्री असो वा आवडती फिल्मी गाणी, आपला ‘रेडू’ आठवतो का?

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईल, स्मार्टवॉचसारख्या आधुनिक गॅझेट्समध्ये गहाळ झाली जुनी ओळख

नागपूर : भारतीय क्रिकेट टीमच्या १९८३च्या कर्तृत्त्वावर आधारित ‘८३’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यातील रेडिओवरील भन्नाट क्रिकेट कॉमेंट्रीचा ज्वर बघून जुन्या काळातील स्मृतींना उजाळा मिळाला. रेडिओ म्हणजे तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्ती आणि त्या काळातील लाईव्ह घटनाक्रमांचा दुवा होता आणि त्याबाबतची उत्सुकता कशी शिगेला पोहोचत होती, ही बाब आजही वयाची साठी उलटलेल्या ज्येष्ठांकडून वर्तमान पिढीला कळते. भारतात आजही रेट्रो काळातील जुन्या फिल्मी गाण्यांसाठी म्हणून रेडिओ ओळखला जातो. रेडिओ म्हणजे आकाशवाणी, हेच समिकरण ठरलेले आहे. मात्र, रेडिओ हे एक गॅझेट असून, आज त्या यंत्राची जागा स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच, स्मार्टपेन आदींनी घेतली आहे.

रेडिओचा शोध

रेडिओचा शोध १८८५ साली इटालियन भौतिकशास्त्रज्ञ मार्कोनी याने लावल्याचे मानले जाते. रेडिओ म्हणजे बिनतारी ध्वनीतरंग संदेशवहन यंत्रणा होय आणि या साधनाचा उपयोग त्यापूर्वीही संदेशवहनासाठी केला जात असल्याचे आढळून येते. रेडिओच्या प्रत्यक्ष वापराची सुरुवात वैज्ञानिक रेगिनाल्ड फेसेंडेन याने २४ डिसेंबर १९०६ रोजी केली होती. त्यानंतर १९१८मध्ये ली द फॉरेस्टने न्यूयॉर्कच्या हायब्रीज क्षेत्रात जगातील पहिले रेडिओ स्टेशन सुरू केले होते.

भारतात रेडिओची सुरुवात

भारतात रेडिओची सुरुवात १९२३ साली रेडिओ क्लब इथे झाली. १९३५च्या कायद्याने राज्य सरकारांना रेडिओ केंद्रे चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीवेळी डॉ. राममनोहर लोहिया यांनी तीन महिने रेडिओ केंद्र चालविले होते. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने मुंबई व कोलकात्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले आणि १९३६मध्ये शासकीय ‘इम्पीरियल रेडिओ ऑफ इंडिया’ची सुरुवात झाली. स्वातंत्र्यानंतर याचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ किंवा ‘आकाशवाणी’ असे झाले. रेडिओच्या विस्तारात भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बसू यांचे योगदान महत्त्वाचे असून, रेडिओ व सूक्ष्म तरंगांवर कार्य करणारे ते पहिले वैज्ञानिक होत. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी भारतात केवळ सहाच रेडिओ स्टेशन्स होती. १५ ऑगस्ट १९५१मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण आकाशवाणीतून प्रसारित झाले होते.

‘मन की बात’ने लोकप्रियतेत भर

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओद्वारे जनसंवादाची क्षमता ओळखत ३ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर रेडिओच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. दर महिन्यात ते रेडिओवरून नागरिकांशी संवाद साधत असतात.

आकाशवाणीची सेवा ९१ टक्के भागात

सध्या भारतातल्या ७२ शहरांमध्ये खासगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत. आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्र आहेत. त्यापैकी १४८ केंद्र ही मध्यमतरंग, ५४ केंद्र ही लघुतरंग तर उरलेली १६८ ही एफ. एम. केंद्र आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितल्यास आकाशवाणी भारताच्या ९१ टक्के भागात सेवा पुरविते. तसेच एकंदर २४ भाषांमध्ये एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात.

- कविता फाले बोरीकर, माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर

........

Web Title: World Radio Day; Whether it's a cricket commentary or a favorite movie song, do you remember 'Redu'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास