अंशुजा किंमतकर यांच्या शुभेच्छापत्रांचा एक विश्वविक्रम असाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 08:10 PM2019-04-20T20:10:55+5:302019-04-20T20:22:27+5:30
टाकाऊ वस्तू आणि वेगवेगळ्या रंगातील कागदापासून शुभेच्छापत्र तयार करण्याचा छंद असलेल्या रामटेक येथील डॉ. अंशुजा किंमतकर यांनी २४ तासात ५०२ हस्तलिखित शुभेच्छापत्रे साकारण्याचा अनोखा विश्वविक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनने नोंद घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (रामटेक) : टाकाऊ वस्तू आणि वेगवेगळ्या रंगातील कागदापासून शुभेच्छापत्र तयार करण्याचा छंद असलेल्या रामटेक येथील डॉ. अंशुजा किंमतकर यांनी २४ तासात ५०२ हस्तलिखित शुभेच्छापत्रे साकारण्याचा अनोखा विश्वविक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनने नोंद घेतली आहे.
रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वर्णेकर सभागृहात १९ एप्रिलच्या सकाळी ८ वाजता त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. २० एप्रिलच्या सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांनी ही शुभेच्छापत्रेसाकारली.
‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनचे अध्यक्ष पवन सोलंकी यांनी शनिवारी या विश्वविक्रमाची घोषणा केली. अंशुजा यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. रामटेक येथे झालेल्या समारंभात सोलंकी यांनी अंशुजा यांना याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
अंशुजा यांनी १७ वर्षांपासून टाकाऊ वस्तू वापरून शुभेच्छापत्रे तयार करण्याचा छंद जोपासला होता. यातून त्यांनी आजपर्यंत अडीच हजार शुभेच्छापत्रांचा संग्रह केला आहे. अंशुजा यांनी काही महिन्यंपूर्वी ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनकडे विश्वविक्रमासंबंधी पत्रव्यवहार केला होता. २४ तासात किमान ४०० शुभेच्छापत्रे तयार करणे हा विश्वविक्रम होऊ शकतो, अशी माहिती त्यांना या संस्थेकडून मिळाली होती. त्यानुसार अंशुजा यांनी सलग २४ तास शुभेच्छापत्रे तयार करण्याचा व विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता.
१९ एप्रिलला सकाळी ८ वाजतापासून त्यांनी ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनच्या टीमच्या उपस्थित विश्वविक्रमाला सुरुवात केली. सलग २४ तास दिवस व रात्र त्यांनी शुभेच्छापत्रे तयार केली.