जागतिक झोप दिवस; झोपेबाबत तुम्ही 'या' प्राण्यासारखे आहात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 10:54 AM2021-03-19T10:54:16+5:302021-03-19T10:54:44+5:30
Nagpur News आरोग्यासाठी झोपेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येऊ लागला. प्रत्येकाच्या झोपेची पद्धत वा कहाणी इथे वेगवेगळी आहे. मात्र या वेगळेपणातही काही साधर्म्य संशोधकांना आढळले आणि त्यांनी ते जगासमोर मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आज जागतिक झोप दिवस. आरोग्यासाठी झोपेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येऊ लागला. प्रत्येकाच्या झोपेची पद्धत वा कहाणी इथे वेगवेगळी आहे. मात्र या वेगळेपणातही काही साधर्म्य संशोधकांना आढळले आणि त्यांनी ते जगासमोर मांडले. संशोधकांच्या मते, आपण चार प्राण्यांपैकी एका प्राण्याप्रमाणे झोपतो. त्यामुळे त्या प्राण्यातील गुणधर्म आपल्याही आढळतात. आपण कोणत्या प्राण्याप्रमाणे आहोत हे जाणून घेतले तर त्याच्या गुणधर्मांचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन कामात करून घेऊ शकतो, असा त्यामागचा हेतू होता.
कोणते आहेत हे चार प्राणी?
संशोधकांच्या मते मानवाची झोप ही, डॉल्फिन, सिंह, अस्वल आणि कोल्हा या चार प्राण्यांसारखी असते.
यातील डॉल्फिन प्रकारची झोप असणारे लोक पहाटे लवकर उठणारे असतात. त्यांना फार कमी झोप येते. वस्तुत: डॉल्फिन झोपल्यावरही त्याचा अर्धा मेंदू जागाच असतो. कारण त्यांना त्याही अवस्थेत पोहायचे असते. अशा पद्धतीचे लोक हे पहाटे उठून लगेचच आपली कामे सुरू करू शकतात.
दुसरा प्राणी आहे सिंह. हाही प्राणी पहाटेच उठणारा.. लहानशा आवाजानेही जागा होणारा.. सकाळी सकाळी शिकारीवर निघणारा. या गटातील माणसेही अशीच. पहाटे उठणारी व खूप एनर्जी असणारी. गंमत म्हणजे यांची पहाटे फुल चार्ज असलेली बॅटरी संध्याकाळपर्यंत संपून जाते. ते संध्याकाळी सुस्तावलेले असतात.
तिसऱ्या प्रकारात येते अस्वल. याला पूर्ण आठ तासांची झोप हवी असते. पहाटे उठणे या गटातील लोकांना फार अवघड जाते व आवडतही नाही.. ते आरामात उठतील. सर्व आवरून कामे सुरू करतील. यांची एनर्जी दिवसभर चांगली राहते. संध्याकाळीही त्यांना थकल्यासारखे वा कंटाळल्यासारखे होत नाही.
चौथ्या प्रकारात येतो कोल्हा. उशीरा उठणारा व उशीरापर्यंत जागू शकणारा. या गटातील लोकांची एनर्जी संध्याकाळी व रात्री दिवसभरासारखीच उत्तम असते. यांना पहाटे उठवण्यासाठी एकाच वेळी अनेक घड्याळांचे गजर वाजवले तरी ते उठणार नाहीत.. त्यांना जेव्हा उठायचे तेव्हाच ते उठणार.
तर ठरवा तुमचा झोपेचा प्रकार आणि आखून घ्या दिवसभराचा कार्यक्रम.