पांढरीशुभ्र चिऊताई पाहिलीय?... आपल्या चुकांमुळे भविष्यात अशाच चिमण्या दिसू शकतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:05 PM2020-03-20T12:05:33+5:302020-03-20T12:27:22+5:30

शहरातील प्रदूषणामुळे रंगद्रव्यांची कमतरता निर्माण होऊन पांढऱ्या रंगाची त्वचा व पंख असलेल्या चिमण्या यापुढे आपल्याला पाहाव्या लागतील की काय, अशी शक्यता निर्माण होण्यासारखे एक वास्तव समोर आले आहे.

World sparrow Day; white sparrow in Nagpur | पांढरीशुभ्र चिऊताई पाहिलीय?... आपल्या चुकांमुळे भविष्यात अशाच चिमण्या दिसू शकतात!

पांढरीशुभ्र चिऊताई पाहिलीय?... आपल्या चुकांमुळे भविष्यात अशाच चिमण्या दिसू शकतात!

googlenewsNext

वर्षा बाशू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्रदूषणामुळे रंगद्रव्यांची कमतरता निर्माण होऊन पांढऱ्या रंगाची त्वचा व पंख असलेल्या चिमण्या यापुढे आपल्याला पाहाव्या लागतील की काय, अशी शक्यता निर्माण होण्यासारखे एक वास्तव समोर आले आहे.
दरवर्षी २० मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. चिमण्यांची झपाट्याने कमी होत असलेली संख्या पाहता या लहानशा पक्ष्याबाबत समाजात जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने या दिनाचे आयोजन केले जात असते.
अवघ्या चार महिन्यांपूर्वीच सोनेगाव तलावाच्या परिसरात ही पांढरी चिमणी आढळून आली आहे. नागपुरातील पक्षिनिरीक्षक प्रवीण कात्रे यांनी तिचे छायाचित्रही काढले होते. अशा प्रकारची पांढरी चिमणी उमरेड तालुक्यातल्या कºहांडला अभयारण्यातही आढळून आली होती, अशी माहिती पक्षिनिरीक्षक व अभ्यासक नितीन मराठे यांनी दिली.
प्रदूषणामुळे चिमण्या व अन्य पक्ष्यांच्या शरीरातील रंगद्रव्यांमध्ये झपाट्याने घट होत आहे. त्याचा परिणाम म्हणून त्यांचे पंख व शरीर पांढरे होत जाताना दिसते आहे. मोबाईल टॉवर्समुळे पक्ष्यांची संख्या तशीही झपाट्याने घसरली आहे. प्रजननकाळात व हिवाळ्यात स्थलांतर करणारे पक्षी वगळता नागपुरातील कावळे व चिमण्यांचा किलबिलाट आता पूर्वीसारखा ऐकू येत नाही.
पक्ष्यांमध्ये रंगीत पंख हा त्यांच्या जीवनचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. प्रजोत्पादनाच्या काळात मादी पक्ष्याला आकर्षित करण्यासाठी नर पक्ष्याला आपल्या रंगीत पंखांचाच आधार घ्यावा लागत असतो. नर पक्ष्याचे पंख जर पांढरे होऊ लागले तर काळाच्या ओघात संपलेल्या पक्ष्यांमध्ये चिमणी हा पक्षीही समाविष्ट होण्याची भीती आहे.

तुम्ही हे करू शकता
चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी आपल्या घराच्या समोर, बाल्कनीत जिथे शक्य असेल तिथे, लहानसे घरटे लटकवून द्या. ते तुम्ही घरी बनवू शकता किंवा विकतही घेऊ शकता. त्या घरट्याजवळ लहानशा ताटलीत दररोज धान्य व पाणी ठेवत जा. काही दिवसात तिथे चिमण्यांची झुंबड उडालेली तुम्हाला दिसेल. घरटे लावणे शक्य नसेल तर किमान धान्य व पाणी दररोज देत जावे. उन्हाळ्याची सुरुवात होते आहे व पक्ष्यांना पाण्यासाठी खूप लांब जावे लागू नये याकरिता ही माणुसकीची पावले तर नक्कीच उचलली जाऊ शकतात.

Web Title: World sparrow Day; white sparrow in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.