जागतिक रंगभूमी दिन; अभ्यासक्रमात येईल का ‘रंगभूमी’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:36 AM2019-03-27T11:36:21+5:302019-03-27T11:39:17+5:30
रंगभूमीचा हा प्रवास विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आला तर मोठं परिवर्तन निर्माण होईल, असे रंगकर्मींना म्हणूनच वाटते.
निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यक्ती आणि कला यातील संवाद म्हणजे नाटक आणि हा संवाद ज्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहचते ते माध्यम म्हणजे रंगभूमी. कोणत्या कालखंडात या रंगभूमीची सुरुवात झाली हा अभ्यासाचा विषय.१८४३ पासून विचार केल्यास मराठी रंगभूमीनेही महत्त्वाची स्थित्यंतरे अनुभवली आणि ओलांडली आहेत. हा प्रवास जेवढा थक्क करणारा तेवढाच येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तो अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे तसाच रंगभूमी, सिनेमाच्या क्षेत्रात मजबुतीने पाऊल ठेवण्यासाठीही आवश्यक आहे. मात्र समाजावर प्रभाव असलेले हे क्षेत्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात येत नाही. रंगभूमीचा हा प्रवास विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आला तर मोठं परिवर्तन निर्माण होईल, असे रंगकर्मींना म्हणूनच वाटते.
खरंतर समाजासाठी मनोरंजनाच्या बदलत गेलेल्या माध्यमांमध्ये रंगभूमीने मोठा काळ व्यापला आहे. नंतरच्या काळात सिनेमा आणि आता तंत्रज्ञानाची अनेक साधने बसल्या जागी उपलब्ध झाली. मात्र रंगभूमीचा प्रभाव आजही कायम आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीने समाजाच्या मनोरंजन व प्रबोधनात मोठे योगदान दिले आहे. तंत्रज्ञानाने लोकांच्या हातात आलेल्या आधुनिक साधनांमुळे यावर अवकळा आली आहे. अधूनमधून होणाऱ्या व्यावसायिक नाटकांना प्रेक्षकांची गर्दी होत असल्याने अद्याप तरी या नाटकांचा प्रभाव टिकून आहे. प्रायोगिक रंगभूमीबाबत मात्र चिंतेची स्थिती असल्याचे मत व्यक्त केले जाते. असे असले तरी ज्यांच्या रक्तात नाटक आहे अशा वेड्या रंगकर्मींच्या प्रयत्नाने आशावादी चित्र निर्माण केले आहे. नागपुरातही अशा अनेक संस्था आणि कलावंत यासाठी धडपडत आहेत, हे महत्त्वाचे. पण हा इतिहास चिरकाळ टिकण्यासाठी त्याला एक स्थायी प्रवाह देणे आवश्यक आहे, असे या क्षेत्रातील माणसांना वाटते. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विनोद इंदूरकर आणि तरुण रंगकर्मी रूपेश पवार यांनी संवादातून याबाबत भूमिका मांडल्या.
परिस्थितीनुसार होत असतो बदल : विनोद इंदूरकर
विजय तेंडूलकर किंवा महेश एलकुंचवार यांनी एक काळ गाजविला हे सत्य आहे, पण आज अवकळा आली असे म्हणणे योग्य वाटत नाही. कला ही त्या त्या वेळी समाजव्यवस्थेच्या बदलाप्रमाणे आणि लोकांच्या अभिरुचीप्रमाणे बदलत असते. त्यावेळच्या नाटककारांनी त्या काळच्या परिस्थितीनुसार नाटके तयार केली. आजचे नाटककार आजची परिस्थित मांडत आहेत. त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही, अशी भावना डॉ. विनोद इंदूरकर यांनी व्यक्त केली. त्यांची नाटके जागतिक स्तरावर गेली आणि आजची नाही, अशी तुलना करता येत नाही. रंगभूमी ही साधकांमुळे तयार होते आणि तसे साधक आजही आहेत. त्यातल्यात्यात प्रायोगिक रंगभूमीमुळे नाटक जिवंत आहेत. प्रायोगिक रंगभूमीच्या कलावंतांनीही व्यावसायिक नाटकांशी तुलना करू नये, कारण दोन्हीचे स्थान आजही तेवढेच महत्त्वाचे आहे. पण जागतिक स्तर गाठण्यासाठी, त्या प्लॅटफार्मवर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून धडे मिळणे आवश्यक आहे.
सिनेमाची आवड, रंगभूमीचा मार्ग : रूपेश पवार
मोबाईल, सोशल मीडिया अशी मनोरंजनाची साधने असली तरी सिनेमा आजही लोकप्रिय माध्यम आहे आणि तरुणांना हे क्षेत्र कायम खुणावत असते. त्यामुळे सिनेमात संधी मिळावी म्हणून हजारो तरुण धडपड करीत असतात. सुरुवातीला सिनेमा हीच तरुणांची आवड असते, मात्र तिथपर्यंत पोहचण्यासाठी रंगभूमी हा सोपा मार्ग आहे, याची जाणीव त्यांना नंतर होते. मग मागवून का होईना तो थिएटरचा मार्ग धरतो. पुढे अभिनय, दिग्दर्शन शिकण्यासाठी रंगभूमी त्यांना सोपे माध्यम वाटते. त्यामुळे शालेयस्तरापासूनच रंगभूमीचा अभ्यास राहिल्यास हे माध्यम त्यांना समजायला लागेल, अशी भावना रूपेश पवार यांनी व्यक्त केली. थिएटरमध्ये आज अनेक परिवर्तन झाले आहेत. आधुनिक साधनांमुळे अभिनेते व प्रेक्षकांचे अंतर कमी झाले आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी अभिनेत्यांना आधी मोठ्याने संवाद साधावा लागायचा, आता त्याची आवश्यकता नसते. सिनेमासारखी वास्तविकता त्यात निर्माण झाली असून, अभिनयही वास्तविक झाला असल्याची भावना त्यांनी मांडली. आधुनिकतेचे आव्हान पेलण्यासाठी रंगभूमीला प्रेक्षकांच्या जवळ जावे लागेल, असे त्यांना वाटते. यासाठी शहरातील वस्त्यांमध्ये तंत्रज्ञानाने सुसज्ज असे लहान लहान थिएटर तयार व्हायला पाहिजे, असे त्यांना वाटते. नव्या माध्यमांमधून नाटकांच्या प्रचाराची कल्पना त्यांनी मांडली.