जागतिक स्ट्रोक दिवस; दर मिनिटाला सहा व्यक्तींना होतो ब्रेन स्ट्रोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 11:18 AM2019-10-29T11:18:22+5:302019-10-29T11:21:50+5:30
भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा उल्लेख फार कमी होतो. परंतु, हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो. हा आकडा एक वर्षात सुमारे २० लाखापर्यंत पोहोचतो व त्यापैकी जवळपास ७ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील ब्रेन स्ट्रोकग्रस्त नागरिकांपैकी २० टक्के नागरिकांचे वय ४० वर्षापेक्षा कमी आहे.
जागतिक न्यूरोलॉजी महासंघाच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी जागतिक स्ट्रोक दिवसानिमित्त ही माहिती दिली. गेल्या २५ वर्षात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. जगात प्रत्येक दोन सेकंदात एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होतो. त्यातील ८० टक्के व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटातील असतात. ब्रेन स्ट्रोक कोणत्याही वयात व कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो, पण ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. स्ट्रोक झाल्यानंतर ३० टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो तर, ३० टक्के व्यक्तींना दीर्घकालीन अपंगत्व येते. उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, उच्च कोलेस्ट्रॉल, चुकीची आहार पद्धती, मद्यप्राशन, हृदयरोग, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कारणे टाळल्यास ब्रेन स्ट्रोकला लांब ठेवता येऊ शकते. रोज एक तास चालल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो अशी माहितीही मेश्राम यांनी दिली.
एड्सपेक्षा जास्त मृत्यू स्ट्रोकने
एड्स, टीबी व मलेरिया यापेक्षा जास्त मृत्यू ब्रेन स्ट्रोकमुळे होतात. ग्रामीण भारतात ब्रेन स्ट्रोक हा मृत्यूचे सामान्य कारण झाला आहे. मेंदूला आॅक्सिजन व जीवनसत्वाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या गोठलेल्या रक्तामुळे बुजल्या किंवा फुटल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होतो. ८० टक्के ब्रेन स्ट्रोक रक्तवाहिन्या बुजल्यामुळे तर, २० टक्के ब्रेन स्ट्रोक रक्तवाहिन्या फुटल्यामुळे होतात.
ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा
चेहरा अचानक गळल्यासारखा होणे, अवयवांत अशक्तपणा जाणवणे, बोलण्यात बदल होणे, चालण्यात अडचण येणे व दृष्टी कमी होणे ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणे आहेत. सध्या ब्रेन स्ट्रोकवर अनेक आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी उपचार केल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका टळला जाऊ शकतो.
अपंगत्व आणण्यात पहिल्या क्रमांकावर
बे्रन स्ट्रोक हा आजार व्यक्तीला अपंगत्व आणणाºया आजारांमध्ये पहिल्या तर, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाºया आजारांमध्ये दुसºया क्रमांकावर आहे. बे्रन स्ट्रोक झाल्यानंतर वाचलेले ८ कोटी व्यक्ती जगात आहेत. त्यापैकी ५ कोटी व्यक्तींना अपंगत्व आले आहे. यावर्षी १ कोटी ४५ लाख व्यक्तींना स्ट्रोक आला. त्यापैकी ५५ लाख व्यक्तींचा मृत्यू झाला असे जागतिक स्ट्रोक संघाचे अध्यक्ष प्रा. मायकेल ब्रेनिन यांनी जागतिक न्यूरोलॉजी परिषदेत बोलताना सांगितले. ही परिषद दुबई येथे झाली. दरम्यान, ब्रेनिन, डॉ. मेश्राम व जागतिक न्यूरोलॉजी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. ºयुजी काझी यांनी ब्रेन स्ट्रोकवर सविस्तर चर्चा केली. प्रा. काझी यांनी स्ट्रोकचा धोका सतत वाढत असून सध्या ४ पैकी १ व्यक्तीला स्ट्रोक येत आहे अशी माहिती दिली.