जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; १३७० जण कंटाळले आयुष्याला; ५० विद्यार्थ्यांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 07:00 AM2021-09-10T07:00:00+5:302021-09-10T07:00:02+5:30
Nagpur News जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. यात सर्वाधिक, ७४६ पुरुष व त्या खालोखाल ६२४ महिला आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सर्वांवर उपचार सुरू असून, ३४४ जणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात रुग्णालयाला यश आले आहे. (World Suicide Prevention Day; 1370 people on the verge of suicide)
कौटुंबिक कलह, ताणतणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून जनजागृती सुरू केली. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांनी प्रयोगिक स्तरावर आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले. आज या कार्यक्रमाला ११ वर्षे होत आहेत. याचा फायदा शेकडो रुग्णांना होत आहे. आता हाच कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर मनोरुग्णालयाच्या मार्गदर्शनात सर्वच जिल्ह्यात राबविला जात आहे.
-५४ टक्के पुरुषांकडून आत्महत्येचा प्रयत्न
कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे, यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. याला सर्वात जास्त पुरुष बळी पडत आहे. परिणामी आत्महत्येचे विचार वाढत आहेत. एप्रिल २०१७ ते ३१ एप्रिल २०२१ या कालावधीत ५४ टक्के म्हणजे, ७४६ पुरुषांमध्ये आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न केला.
-११ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यांना सांभाळा
मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढत आहे. यात ११ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या चार वर्षात ११ ते २० या वयोगटात ३६, तर २१ ते ३० या वयोगटात १४ असे ५० विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते.
- पुरुष व महिलांसाठी तरुण वय भारी
कुटुंबांच्या गरजांचा भार, यातून निर्माण होणारे मानसिक संघर्ष, नैराश्य, चिंता याला सर्वात तरुण वर्ग बळी पडतात. परिणामी आत्महत्येचे विचार वाढतात. गेल्या चार वर्षांत ११ ते २० या वयोगटात ८०, २१ ते ३० वयोगटात ३६६, ३१ ते ४० वयोगटात ४०६ असे एकूण ८५२ तरुण आत्महत्येचा उंबरठ्यावर होते.
- डायल करा १०४ क्रमांक
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाणही वाढत आहेत. अशांसाठी १०४ हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून मदत मागता येईल. या शिवाय प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने सर्व जिल्हा रुग्णालायत सुरू करण्यात आलेल्या ‘प्रेरणा’ प्रकल्पातूनही मदत घेता येईल.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय