जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; २१ ते ४० वयात सर्वाधिकआत्महत्येचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:56 AM2019-09-10T10:56:13+5:302019-09-10T10:58:47+5:30
एकट्या प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या दोन वर्षात २१ ते ४० या तरुण वयोगटात ३९१ जण आत्महत्येस प्रवृत्त झाले होते. यात ७ विद्यार्थी, ६ शेतकरी, २२२ पुरुष तर १६९ महिलांचा समावेश आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात एकूण होणाऱ्या आत्महत्यांच्या १० टक्के आत्महत्या या एकट्या भारतात होतात. त्यातील जवळजवळ ४० टक्के आत्महत्या या चाळिशीच्या आतील तरुणांनी केलेल्या असतात. याच वयात आत्महत्येचे प्रयत्न करण्याचे प्रमाणही खूप जास्त आहे. एकट्या प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या दोन वर्षात २१ ते ४० या तरुण वयोगटात ३९१ जण आत्महत्येस प्रवृत्त झाले होते. यात ७ विद्यार्थी, ६ शेतकरी, २२२ पुरुष तर १६९ महिलांचा समावेश आहे.
नैराश्यातून आत्महत्येकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतात आठ व्यक्तींमागे एकजण नैराश्यग्रस्त आहे. एका अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोक आत्महत्या करतात. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या कितीतरी जास्त आहे. तज्ज्ञाच्या मते, वेळीच उपचाराला सुरुवात केल्यास नैराश्य ते आत्महत्या हा प्रवास टाळता येऊ शकतो. याच उद्देशाने प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले आहे. बहुसंख्य रुग्णांना उपचाराखाली आणून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून नवे जीवन दिले जात आहे. मनोरुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत आत्महत्येचे विचार व आत्महत्येचा प्रयत्न केलेले ६९० रुग्ण उपचारासाठी मनोरुग्णालयात आले. यात २५ विद्यार्थी, १९ शेतकरी, ३६४ पुरुष व ३१७ महिलांचा समावेश होता.
पुरुष व महिलांसाठी तरुण वय भारी
कुटुंबाचा गरजांचा भार, यातून निर्माण होणारे मानसिक संघर्ष, नैराश्य, चिंता याला सर्वात तरुण वर्ग बळी पडतात. परिणामी आत्महत्येचे विचार वाढतात. मनोरुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या आकेडवारीनुसार गेल्या दोन वर्षांत ३१७ महिलांनी तर ३६१ पुरुषांनी आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. यात २१ ते ३० वर्षे वयोगटातील पुरुषांची संख्या १२२ तर महिलांची संख्या ६६ होती, तर ३१ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषांची संख्या १०० तर महिलांची संख्या १०३ होती.
विद्यार्थ्यांमध्ये १० ते २० वयोगट धोकादायक
मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढतच आहे. यात १० ते २० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या दोन वर्षात या वयोगटातील १८ तर २१ ते ३० या वयोगटात सात विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते.
४१ ते ५० वयोगटातील शेतकऱ्यांकडे द्या लक्ष
कर्जबाजारीपणा, नापिकी या गोष्टींना कंटाळून गेल्या दोन वर्षात १९ शेतकरी गळयाला दोरीचा फास लावण्याच्याच तयारीत होते. यात ४१ ते ५० वर्षे वयोगटातील सात शेतकऱ्यांचा समावेश होता. त्या खालोखाल ५१ ते ६० वर्षे वयोगटात पाच शेतकरी होते. तरुण वयोगट असलेल्या २१ ते ३० वर्षे वयोगटात तीन, ३१ ते ४० वयोगटात तीन तर ६० व त्यापेक्षा जास्त वयोगटात एक शेतकरी होता.
प्रादेशिक मनोरुग्णालयातील आत्महत्या प्रतिबंधक कक्षात गेल्या दोन वर्षात आलेल्या ६९० रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना उपचाराखाली आणले आहे. यातील २७२ रुग्ण पुर्णत: बरे झाले आहेत. १६७ रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित २५० रुग्णांवर उपचाराबाबत पाठपुरावा केला जात आहे. रुग्णालयातील ‘आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम’ अशा रुग्णांसाठीचे मोलाचे ठरले असून उपचारामुळे त्यांना नवे जीवन मिळत आहे.
-डॉ. माधुरी थोरात, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय