जागतिक रंगभूमी दिन; कोरोनाच्या छत्रछायेतील नाटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 10:26 AM2020-03-27T10:26:40+5:302020-03-27T10:27:03+5:30
२७ मार्च ला ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा केला जातो. त्याअनुषंगाने या दिवशी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात असतात. मात्र, यंदा अमेरिकेच्या ‘ब्रॉडवे स्ट्रीट’पासून ते नागपूर शेजारच्या ‘झाडीपट्टी रंगभूमी’पर्यंत सगळी रंगभूमी थांबली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतत डोकॅलिटी करत नित्य नव्या घटनांतून नुतन असे काही देण्याचे प्रयत्न नाटककार करत असतात. जन्म होणार असो वा मृत्यू... यासारख्या प्रत्येक सुखकारक, दु:खकारक गोष्टी नाट्यकलेला चालना देणाऱ्या आहेत. कोरोनाच्या विळख्याने सारे जग हतबल झाले असून, संपूर्ण जग ‘लॉकडाऊन’ झाले आहे. मात्र, कल्पनांचे धुमारे या अत्यंत भयावह परिस्थितीतही फुटत आहेत आणि नाट्यक्षेत्रात नव्या कल्पनांना चालना दिली जात आहे. कोरोनाच्या छत्रछायेत नाट्यकलेला नवा आयाम प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे.
२७ मार्च ला ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा केला जातो. त्याअनुषंगाने या दिवशी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात असतात. मात्र, यंदा अमेरिकेच्या ‘ब्रॉडवे स्ट्रीट’पासून ते नागपूर शेजारच्या ‘झाडीपट्टी रंगभूमी’पर्यंत सगळी रंगभूमी थांबली आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील नाट्यसंघांना तेथील आरोग्य विभागातर्फे पत्र देऊन कलाविष्कार स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि त्यासाठी दिलगीरीही व्यक्त करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे जगभरातील ग्रीस, ब्रिटन, रशिया, चिन येथेही नाट्यउपक्रम थांबविण्यात आले आहेत. भारतही यापासून वेगळा नाही. अशा स्थितीत रंगकर्मी दुसरे काय करणार, असा प्रश्न आहे. मात्र, त्यातही नाटुकले स्वस्थ बसतील तर काय अर्थ! त्यामुळे, नाटूकले जागतिक रंगभूमीला विशेष अशी क्रीयेटीव्हीटी सादर करण्याच्या प्रयत्नात आहेत. रंगभूमीवरचा हा काळ म्हणजे ‘कोरोनाच्या छत्रछायेतील (सावटातील) नाटक’ आहे. जागतिक रंगभूमी दिनाला ‘कोरोना विशेष’ प्रयोग रंगण्याची शक्यता आहे.
फेसबूक, इन्स्टाग्राम रंगणार नाटकांनी
स्वस्थ बसेल तो रंगकर्मी नव्हे. त्यामुळे, जागतिक रंगभूमी दिनाला प्रत्येक रंगकर्मीने फेसबूक लाईव्ह, इन्स्टाग्राम किंवा अन्य सोशल माध्यमांवर नाटकाचे प्रयोग सादर करण्याच्या योजना नागपूरकर रंगकर्मीकडून सुरू झाल्या आहेत. एक-दोन मिनिटांचे अभिनयाचे व्हीडीओ टाकावे आणि त्याला प्रत्युत्तर देणारे साभिनय संवादाचे व्हीडीओ दुसºया रंगकर्मीने अपलोड करावे, असे आवाहन केल्या जात आहेत. अशी ही जुगलबंदी जागतिक रंगभूमी दिनी कोरोना विषाणूच्या सावटात रंगणार आहे.