जागतिक रंगभूमी दिन; नाट्य परंपरेतील तटस्थतेला तडा कधी जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 08:05 AM2021-03-27T08:05:32+5:302021-03-27T08:06:51+5:30
Nagpur news नाट्य परंपरेचा वारसा आणि आविष्कार भारतीय कलावंत आणि रसिकांनी अखंडित चालविला आहे. मात्र, वर्तमान काळात या परंपरेला तटस्थतेचे घट्ट असे आवरण बसले आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभिव्यक्तीतले आविष्कार रसिकांपुढे सादर करणारे सर्वोत्तम माध्यम म्हणजे नाटक ही कला. मराठी रंगभूमीचा इतिहास १८४३ सालापासून सांगितला जात असला तरी भारतीय जनमानसाला नाट्यकलेची ओळख प्राचीन आहे. कीर्तन, पोवाडे, लोककला आदींतून नाट्यकलेचा विकास सुरूच होता. भरतमुनींनी प्राचीन काळातच नाट्यशास्त्र अर्थात पाचव्या वेदाची पायाभरणी केली होती. त्यानंतर कालिदास, भवभूती, भास, अश्वघोष, शुद्रका आदींची नावे संस्कृत, प्राकृत भाषेतील नाटकांतून पुढे येतात. नाट्य परंपरेचा वारसा आणि आविष्कार भारतीय कलावंत आणि रसिकांनी अखंडित चालविला आहे. मात्र, वर्तमान काळात या परंपरेला तटस्थतेचे घट्ट असे आवरण बसले आहे. नागपूर-विदर्भात हे आवरण फुटता फुटेना, अशी स्थिती आहे. याला तडा देण्याचे प्रयत्न उणिवेनेच झालेले दिसून येतात.
नागपूर-विदर्भात अनेक नाटककार झाले आणि नाटककारांची घडणावळ चालूच आहे. मात्र, अजूनही डबक्यात साचलेल्या बेडकासारखीच स्थिती येथील नाटककारांची दिसून येते. त्यात नाट्यलेखक, दिग्दर्शक, अभिनेते-अभिनेत्री, तंत्रज्ञ आणि रसिक या सर्वांचा समावेश होतो. पारंपरिक फ्लॅटपिसमधली कौटुंबिक, रंजनात्मक, विनोदी नाटकांच्या पलीकडे नाटक आजही दिसून येत नाहीत. वैचारिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर जातिप्रथेवर, महिला विवंचनेवर, कृषी व्यथेवर आधारित नाटकांचे पीक आले आहे. मात्र, त्यात नावीन्यतेचा अभाव कायमच दिसून आला आहे. विशेष म्हणजे, जगभरातील नाट्य संस्कृतीत चाललेल्या घडामोडींपासून येथील रंगकर्मी अजूनही अलिप्त आहेत. आपल्या वैशिष्ट्यांमुळे देशाबाहेर येथील नाटकांना आमंत्रित केले जाईल, अशा कलाकृतींची संख्या निरंक आहे. येथील काही नाट्यसंस्थांनी देशाबाहेरचा प्रवास केला, राज्यभरात जाऊन पोहोचलेही. मात्र, चरित्र नाटक यापलीकडे त्यांचे कौशल्य दिसून येत नाही. स्पर्धेत अडकलेल्या नागपूर-वैदर्भीय रंगभूमीची अवस्था परीक्षकांच्या अनास्थेमुळेही दारुण झाली आहे. काही नाट्यप्रयोग तटस्थतेला फाटा फोडणारेही होते. मात्र, परीक्षकांच्या अज्ञानाने आणि रसिकांच्या उदासीनतेमुळे अशा आविष्कारी नाट्यप्रयोगांचा गाडा कधीच पुढे सरकू शकला नाही. शिवाय, आंतरराष्ट्रीय नाट्यक्षेत्राचा सेतू बांधण्यासाठी कलारसिक म्हणा व जाणकारांनी कधीच प्रयत्न केले नसल्याचेच दिसून येते.
जागतिक जाळे विणण्यात अपयशी
प्रत्येक क्षेत्राने आपापले जाळे विणण्याचे काम यशस्वीरित्या केले आहे. मात्र, नाटकांच्या बाबतीत हे जाळे विणण्यात अपयशच आले आहे. विशेष म्हणजे, असे प्रयत्न करावेसे कुणालाच वाटले नाहीत. देशाबाहेरचे सोडा, बंगाल, केरळ, उत्तर भारतात नाट्यसंस्कृतीचे अपडेट्स किती जणांकडे असतात, हा प्रश्न आहे. वेगवेगळ्या देशातील, प्रदेशातील नाट्य संस्थांनी नाट्यविषयक घोषणा करावी आणि वर्षभर त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. मात्र, याबाबतीत कुणीच जागरूक नाहीत.
- डॉ. विनोद इंदूरकर, ज्येष्ठ रंगकर्मी व राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीचे तज्ज्ञ सदस्य
सगळ्यांमध्येच जाणिवेची उणीव
नागपूरची हौशी रंगभूमी स्पर्धात्मक आहे. येथे नवे नाट्य आविष्कार झाले तरी परीक्षकांच्या अज्ञानामुळे ते मागे पडते. शिवाय, ज्येष्ठ रंगकर्मींनाही अशा आविष्कारात रस नसतो. रसिक तर दूरच राहिला. त्यामुळे, नाट्य आविष्कारविषयक जाणिवा समृद्ध करण्यासाठी परीक्षक, रसिक व रंगकर्मींना सज्ज व्हावे लागेल. मीसुद्धा ‘आख्यान फितरती चोर’ हे नाटक कीर्तनप्रकारात सादर केले होते. मात्र, पुढे पोहोचूच शकले नाही.
- पीयूष धुमकेकर, रंगकर्मी व माजी विद्यार्थी : राष्ट्रीय नाट्य विद्यालय
शिक्षणात नाटक नाही, हीच समस्या
आपल्याकडे नाटक ग्रॅज्युएशननंतर केले जाते, ही शोकांतिका आहे. शालेय जीवनातच नाटकाचे शिक्षण पाठ्यपुस्तकांत आले तर परिणाम दिसून येईल. नवआविष्कारांची प्रोसेस सुरू आहे. मात्र, ती गती अत्यंत धीमी आहे. याबाबत सगळ्यांनाच एज्युकेट व्हावे लागेल.
- मंगल सानप, रंगकर्मी व माजी विद्यार्थी : राष्ट्रीय नाट्यविद्यालय