जागतिक वाघ दिन; वाघांचे ‘बंदिस्त प्रजनन’ नैतिक की अनैतिक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:50 AM2021-07-29T11:50:12+5:302021-07-29T11:55:36+5:30
Nagpur News जगभरात जंगलातील नैसर्गिक वाघांची संख्या ३९०० असताना कॅप्टिव्ह वाघांची संख्या ५००० च्या वर आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात वाघांची संख्या वाढली; पण जागतिकस्तरावर ती नगण्यच आहे. म्हणूनच अस्तित्वाचे संकट असलेल्या प्रजातीत वाघाचाही समावेश हाेताे. प्राणी, पक्षी आदी काेणत्याही प्रजाती नामशेष हाेण्यापासून वाचविण्यासाठी ‘कॅप्टिव्ह ब्रिडिंग’ (बंदिस्त प्रजनन) ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार वाघांच्या संवर्धनासाठीही कॅप्टिव्ह ब्रिडिंग तंत्राचा उपयाेग केला गेला. आश्चर्य म्हणजे, जगभरात जंगलातील नैसर्गिक वाघांची संख्या ३९०० असताना कॅप्टिव्ह वाघांची संख्या ५००० च्या वर आहे.
गेल्या १०० वर्षांत पृथ्वीवरील वाघांची संख्या ९५ टक्के कमी झाली आहे. सुमात्रा बेटातील ‘बाली’ व ‘जावन’ या दाेन प्रजाती नामशेष झाल्या आहेत. आता केवळ ६ प्रजातीचे अस्तित्व राहिलेले आहे. गेल्या दशकभरात भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशात वाघांची संख्या दुपटीने वाढली, ही महत्त्वाची गाेष्ट आहे. मात्र इतर देशात संख्या अगदीच नगण्य असल्याने कॅप्टिव्ह ब्रिडिंगचे तंत्र वापरून संख्या वाढविली जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या प्रकाराच्या विराेधात आवाज उठविला जात आहे. नामशेष हाेणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनाच्या नावावर प्राणिसंग्रहालयात शाेभेसाठी व अंगतस्करीसाठी त्याचा वापर केला जात असल्याचा आराेप पर्यावरणवाद्यांकडून हाेत आहे. अमेरिका व ‘झेक रिपब्लिक’सारख्या देशात या अनैसर्गिक प्रकाराला जाेरदार विराेध केला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतात वाघाच्या कॅप्टिव्ह ब्रिडिंगचा विचार हाेत नसला तरी माळढाेक व गिधाड या प्रजातींबाबत संशाेधन केले जात आहे.
- अमेरिकेत ५००० च्या आसपास वाघाच्या कॅप्टिव्ह ब्रिड, ३५० प्राणिसंग्रहालयात.
- झेक रिपब्लिकमध्ये ३९० ची उत्पत्ती, ३९ प्राणिसंग्रहालयात
कॅप्टिव्ह ब्रिडिंग काय?
नैसर्गिक अधिवासात किंवा प्रयाेगशाळेत बंदिस्त पिंजऱ्यात प्रजनन घडवून प्राणी किंवा पक्ष्यांची उत्पत्ती करणे हाेय. १९६० च्या दशकात या पद्धतीने ‘अरेबियन ऑरिक्स’ या प्राण्याच्या उत्पत्तीद्वारे ही सुरुवात झाली. आता तर काेल्हे, चित्ते, बिबटे, सिंह व अनेक पक्ष्यांच्या प्रजातींची उत्पत्ती या पद्धतीने करण्यात आली आहे. नामशेष हाेणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी कॅप्टिव्ह ब्रिडिंग महत्त्वाची मानली जाते व अनेक प्रजातींचे संवर्धन करता येत आहे.
पर्यावरणवाद्यांचे आक्षेप
- जैवविविधतेसाठी धाेकादायक
- या वाघांना सर्कसमध्ये, प्राणिसंग्रहालयात शाेभेसाठी वापरणे, रिसर्चसाठी वापरून अत्याचार केले जातात.
- कॅप्टिव्ह ब्रिडिंगनंतर जन्माला येणारी प्रजाती नैसर्गिक प्रजातीपेक्षा कमजाेर व राेगीट असते.
- जनुकीयदृष्ट्या कमजाेर ब्रिड तयार झाल्याने पुन्हा नामशेष हाेण्याचा धाेका.
औषधांसाठी अंगाची तस्करी
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गाेपाल ठाेसर यांनी सांगितले, अनेक औषधांमध्ये वाघांच्या अंगांचा वापर केला जाताे. विशेषत: चीनसारख्या देशात अनेक देशी औषधांमध्ये इतर प्राण्यांसह वाघांच्या अंगाचा वापर केला जाताे. मात्र या प्रजाती नैसर्गिक नसल्याने मग नैसर्गिक जंगली वाघांची अवैध तस्करी केली जाते.
नैसर्गिक व अनैसर्गिकमध्ये फरक असताेच. नैसर्गिक प्रजाती अधिक क्षमतावान असतात. कॅप्टिव्ह ब्रिडचे वाघ नैसर्गिक अधिवासात टिकाव धरू शकत नाही. प्रजातीच्या संवर्धनाच्या नावावर केले जात असले तरी हे एकप्रकारे अत्याचार केल्यासारखे आहे. त्यापेक्षा वाघांच्या नैसर्गिक संवर्धनाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे. दुपटीने वाघ वाढविणाऱ्या भारताचे अनुकरण करावे.
- गाेपाल ठाेसर, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक