जागतिक क्षयरोग दिन; शोध अभियानातून चार हजारावर रुग्ण सुटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 08:53 AM2021-03-24T08:53:37+5:302021-03-24T08:53:57+5:30
Nagpur news कोरोनाच्या भीतीमुळे व गैरसमजामुळे क्षयरोगाचे रुग्ण समोर येतच नाही. या सर्वाचा परिणाम शोध अभियानावर झाला आहे. शहर व ग्रामीणमधील जवळपास १० ते ११ हजार रुग्ण आढळून येण्याची शक्यता असताना ७,३३६ रुग्णांचाच शोध लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर आणि ग्रामीण भागात कुष्ठरोग व क्षयराग शोध अभियान सुरू आहे. याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातही जुंपले आहे. यातच कोरोनाच्या भीतीमुळे व गैरसमजामुळे क्षयरोगाचे रुग्ण समोर येतच नाही. या सर्वाचा परिणाम शोध अभियानावर झाला आहे. शहर व ग्रामीणमधील जवळपास १० ते ११ हजार रुग्ण आढळून येण्याची शक्यता असताना ७,३३६ रुग्णांचाच शोध लागला आहे. उर्वरित तीन ते चार हजारांवर रुग्ण सुटल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांच्याकडून इतरांना लागण झाल्यास, कोरोनापेक्षा बिकट स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
दरम्यानच्या काळात मंदावलेला कोरोना प्रादुर्भावाचा पुन्हा वेग वाढला आहे. विदर्भात सर्वात वाईट परिस्थिती नागपूर जिल्ह्यात उद्भवली आहे. जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा फटका कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियानांतर्गत संशयित रुग्ण हुडकून त्यांची तपासणी करण्याच्या मोहिमेलाही बसला आहे. ग्रामीणमध्ये ही मोहीम हाती घेतली तेव्हा जवळपास २,५०० क्षयरुग्ण आढळून येण्याची शक्यता होती. परंतु १९७३ नवे रुग्ण आढळून आले. साधारण ५०० रुग्ण अजूनही विना उपचार फिरत आहेत. तसेच शहरात आठ ते नऊ हजार नवे रुग्ण दिसून येण्याची शक्यता असताना ५,३६३ रुग्णांचेच निदान होऊ शकले. जवळपास तीन ते चार हजारांवर रुग्णांची नोंद झाली नसावी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. हे रुग्ण उपचाराखाली असते तर ते बरे होऊन त्यांच्यापासून इतरांना होणाऱ्या क्षयरोगाची जोखीम कमी झाली असती.
- शहरात ४०७ तर, ग्रामीणमध्ये ४८ मृत्यू
जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये शहरात ४०७ तर ग्रामीणमध्ये ४८ असे एकूण ४५५ क्षयरोगाच्या रुग्णाचे मृत्यू झाले. ही संख्या मोठी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरात ‘एमडीआर’(मल्टी ड्रग रेझिस्टंट) टीबी असलेले ९९ तर, ग्रामीणमध्ये ५१ रुग्ण आहेत.
- क्षयरोगाच्या संशयित रुग्णांनी स्वत:ची जबाबदारी पाळावी
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शैलेजा जिचकार यांनी सांगितले, क्षयरोग हा वेगाने पसरणारा आजार आहे. कोरोनाच्या या प्रादुर्भावातही क्षयरोग शोधमोहिम सुरू आहे. ही मोहीम रोगाचे निदान करून रुग्णांना उपचाराखाली आणणारी आहे. यामुळे क्षयरोगाच्या संशयित रुग्णांनी मोहिमेत मदत करावी किंवा स्वत:ची जबाबदारी ओळखून जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी.