जागतिक पशुवैद्यक दिन; माणसांच्या आजाराने कुत्रेही ग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 08:10 AM2023-04-29T08:10:00+5:302023-04-29T08:10:02+5:30
Nagpur News मानवी आजाराचे निदान करण्यासाठी जशा यंत्रणा व औषधोपचार आहेत तशाच यंत्रणा कुत्र्यांना जडणाऱ्या आजारांच्या बाबतीतही आहे. जनावरांमध्ये वाढलेल्या व्याधींमुळे पशुवैद्यक क्षेत्राचे महत्त्व वाढले आहे.
नागपूर : धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानवाला अनेक व्याधी जडल्या आहेत. तशाच व्याधी माणसाचा मित्र म्हणविणाऱ्या कुत्रा या पशुमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. विशेष म्हणजे, मानवी आजाराचे निदान करण्यासाठी जशा यंत्रणा व औषधोपचार आहेत तशाच यंत्रणा कुत्र्यांना जडणाऱ्या आजारांच्या बाबतीतही आहे. जनावरांमध्ये वाढलेल्या व्याधींमुळे पशुवैद्यक क्षेत्राचे महत्त्व वाढले आहे.
पूर्वी ग्रामीण भागातच पशुवैद्यक सेवा द्यायचे. कारण जनावरांची संख्या गावातच असायची. दुधाळू जनावरे किंवा शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या जनावरांवरच पूर्वी उपचार व्हायचा. गेल्या काही वर्षात मोठमोठ्या शहरांमध्ये पशुवैद्यकांची मागणी वाढली आहे. कारण शहरात स्टेटस सिंबॉल म्हणून विदेशी प्रजातीची जनावरे पाळली जात आहेत. यात ससे, गिनिपीग, पांढरे उंदीर, हॅम्सटर, लव्हबर्ड, अमेरिकन पॅरेट, विदेशी मांजर, सिंगापुरी स्नेक, कासव आदींचा समावेश आहे; पण सर्वाधिक विदेशी पशूंमध्ये कुत्रे पाळले जात आहे. हे प्राणी पाळणारे स्वत:च्या आरोग्यासारखीच पशूंचीही काळजी घेतात. त्यामुळे पशूंमध्येही माणसाप्रमाणेच आजारांचे निदान होत आहे. खासकरून कुत्र्यांमध्ये अशा आजारांची संख्या भरपूर आहे.
- कुत्र्यांमध्ये आजाराची टक्केवारी
ओबॅसिटी - २० ते ३० टक्के
किडनी स्टोन - ८ ते १० टक्के
यकृताचे आजार - ८ ते १० टक्के
डायबिटिज - मोतीबिंदू झालेल्या कुत्र्यांमध्ये ५० टक्के
हृदयरोग - ५ टक्के
वात - १५ ते २० टक्के
कॅन्सर - २० टक्के
- उपचारही आधुनिक
आजाराचे निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, एक्सरे हे पर्याय आहे. कॅन्सर झालेल्या कुत्र्यांना किमोथेरेपी, रेडिएशन, इमिनोथेरेपी दिले जाते. मोठमोठ्या फार्मासिटिकल कंपन्यांचे या आजारावरच्या औषधी उपलब्ध आहे. आजारानुसार डायटदेखील उपलब्ध आहे. कॅन्सरच्या गाठी सर्जरी करून काढल्या जातात.
- विदेशी कुत्रे लाखो रुपयांपर्यंत मिळतात. त्यामुळे कुत्र्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांचे नियमित लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यांचा डायट, व्यायाम, स्वच्छता याची काळजी घेण्याची गरज आहे. कुत्र्यांची नियमित तपासणी केल्यास हे टाळता येते. विशेष म्हणजे, पाळीव प्राण्यांचा हेल्थ इन्श्यूरन्सदेखील असतो; परंतु, त्याच्याबद्दल जनजागृती नाही.
- डॉ. हेमंत जैन, पशुचिकित्सक