जागतिक जल दिन! ‘जलयुक्त शिवार’मुळे नागपूर जिल्ह्यात वाढला पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:54 AM2018-03-22T10:54:48+5:302018-03-22T10:54:55+5:30

राज्य शासनानेही पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्रसाठी ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. जलयुक्त शिवारमुळे पहिल्या दोन वर्षातच नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली आहे, हे विशेष.

World Water Day! Water storage in Nagpur district increased due to water tank | जागतिक जल दिन! ‘जलयुक्त शिवार’मुळे नागपूर जिल्ह्यात वाढला पाणीसाठा

जागतिक जल दिन! ‘जलयुक्त शिवार’मुळे नागपूर जिल्ह्यात वाढला पाणीसाठा

Next
ठळक मुद्देसिंचन क्षेत्र वाढले गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी योजनांनाही प्रतिसाद

आनंद डेकाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाणीटंचाई ही तशी जागतिक समस्या. जगभरात त्याबाबत बरीच जनजागृती सुरू आहे. शासनस्तरावरही मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. राज्य शासनानेही पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्रसाठी ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. लोकांचा सहभाग आणि शासनाची भरघोस मदत यातून सुरू असलेले हे अभियान नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. जलयुक्त शिवारमुळे पहिल्या दोन वर्षातच नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली आहे, हे विशेष.
नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर हा परिसर संत्रा बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर संत्रा लावला जातो. परंतु या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खाली आहे. १०० टक्के पाण्याचा उपसा झालेला भाग हा शासकीयदृष्ट्या डार्क झोन म्हणून घोषित केला जातो. या भागातही जवळपास ८० टक्के पाण्याचा उपसा झाला, त्यामुळे हा परिसर सेमी डार्क झोनमध्ये गणल्या जाऊ लागला. या भागात नवीन बोअरवेलवर बंदी घालण्यात आली. साहजिकच या सर्वांचा परिणाम संत्रा उत्पादनावरही झाला. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू लागली. परंतु जलयुक्त शिवारमुळे सध्या येथील परिस्थितीत कमालीची सुधारणा होत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये राज्य शासनाने जलयुक्त शिवारची घोषणा केली. २०१५-१६ मध्ये ३१३ गावांची निवड करण्यात आली. पहिल्याच वर्षी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश गावांतील कामे पूर्ण झाली. २०१६-१७ मध्ये नियोजनपूर्ण १८५ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ३०३६ कामे सुरू झाली. यापैकी २९३६ कामे पूर्ण करण्यात आली. या सर्व कामांवर तब्बल ७४ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक १७३२ कामे ही कृषी विभागाने केली. वन विभागाने ३३० कामे, लघु सिंचन(जि.प.)ने २१७ कामे, ग्रामीण पाणी पुरवठ्याने ३९ कामे, भूजल सर्वेक्षणाने १२५ कामे केली. यात ग्राम पंचायतही मागे राहिली नाही. त्यांनी तब्बल ४२० कामे पूर्ण केली. यावर्षी (२०१७-१८) मध्ये २२० गावांचे नियोजन करण्यात आलेले आहे. जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरण, सरलीकरण, सिमेंट बंधारा, जुना बंधाऱ्याची दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतांमधून गेलेल्या नाले बंधाऱ्यात पाणी वाढले आहे. परिसरातील जवळपासच्या विहिरींमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. यासोबतच शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी या योजनाही जलयुक्त शिवारच्या सोबतीलाच राबविण्यास सुरुवात केली. गाळमुक्त धरणमुळे २०१६-१७ मध्ये ५४ गावांतील ५८ लघु सिंचन तलावातील १ लाख २४ हजार ४१० घनमीटर गाळ काढण्यात आला. तर २०१७-१८ मध्ये १०७ लघु सिंचन तलाव, १५ पाझर तलाव, ३० मामा तलाव अशा एकूण १५२ तलावांमधील तब्बल २८ लाख ६४ हजार ४२० घनमीटर गाळ काढण्यात आला. यासोबतच मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १३३७ आणि सिंचन विहिरी योजनेंतर्गत एकूण ५६७३ मंजूर सिंचन विहिरींपैकी ३५८५ पूर्ण झाल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागपूर जिल्ह्यातील नाल्यांमध्ये, तलावांमध्ये, विहिरींमधील पाण्याचा साठा वाढला आहे.

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक
जलयुक्त शिवारमध्ये नागपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले आहे. काटोल व नरखेडमध्ये राबविलेल्या कामांचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरवसुद्धा करण्यात आला आहे.

Web Title: World Water Day! Water storage in Nagpur district increased due to water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी