भारतीय संस्कृतीतून विश्वकल्याण, नागपूरच्या भूमीतून जगाला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 10:55 AM2023-03-22T10:55:21+5:302023-03-22T10:56:40+5:30
‘सी-२० समिट’चा समारोप : मानवतेच्या मूल्यांतूनच शाश्वत बदलांचा मार्ग
नागपूर : ‘जी-२०’अंतर्गत आयोजित ‘सी-२० समिट’मध्ये देश-विदेशातील प्रतिनिधी व तज्ज्ञांचे विविध विषयांवर मंथन झाले. जगभरातील विविधतेचा आदर करत मानवतेला सर्वोच्च मानूनच सामान्य माणसाच्या आयुष्यात शाश्वत बदल होऊ शकतो. भारतीय संस्कृतीतील संस्कार, आचार, विचार यातूनच विश्वकल्याण होऊ शकते, असा नागपूरच्या भूमीतून जगाला संदेश देण्यात आला.
‘सी-२० समिट’चा मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, सी-२० परिषदेच्या उद्घाटक माता अमृतानंदमयी देवी, जी-२० चे शेरपा तसेच भारताचे माजी राजदूत विजय नांबियार, जी-२० चे शेरपा तसेच विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर, सी-२० सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
एक जग, एक कुटुंब, एक भविष्य या मान्यतेवर पुढील काळात वाटचाल करण्याचा संकल्प ‘सी-२०’मध्ये घेण्यात आला. हे धोरण ठरविताना जगाच्या विविधतेचा आदर करताना मानवतेला सर्वोच्च स्थान देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत मानवतेला धोका निर्माण होणार नाही. प्रत्येकाच्या सांस्कृतिक वारशावर तेथील आर्थिक उन्नती अवलंबून असते. त्यामुळे मूळ गाभ्याला धोका पोहोचणार नाही, अशी वाटचाल करण्याची अपेक्षा मान्यवरांनी समारोपीय भाषणात व्यक्त केली.
नागपुरात झालेल्या ‘सी-२०’च्या विचारमंथनातून तयार झालेल्या प्रस्तावांची मांडणी पुढील बैठकीत करण्यात येणार आहे. जयपूर येथे ३१ जुलै २०२३ रोजी पार पडणाऱ्या सी-२० च्या शिखर परिषदेत नागपुरातील परिषदेतील मंथनातून आलेले विषय अंतर्भूत होतील.
गतिशील अर्थसत्ता ही भारताची ओळख : गडकरी
मूल्यांवर आधारित भारतीय कुटुंबरचना व त्यातून वसुधैव कुटुंबकम् भूमिका साकारताना समतोल विकासाचे आर्थिक आणि सामाजिक विकासाचे धोरण अवलंबावे लागेल. जगातील गतीने विकसित होणारी अर्थसत्ता म्हणून भारत पुढे येत आहे. मात्र, ही वाटचाल सुरू असताना आमची सामाजिक वाटचाल ही मूल्याधारित, आर्थिकदृष्टया सक्षम, पर्यावरणपूरक व निसर्गाशी एकरूप असणारी अशी असावी, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. शेतीला आता केवळ अन्नधान्य पुरवठा करणारे कोठार न समजता ऊर्जास्त्रोत तयार करण्याचा संकल्प देशाने केला असून, २०७० अगोदर भारताला कार्बनमुक्त देश करणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
या विषयांवर परिसंवादांचे आयोजन
- पर्यावरणासोबत विकासाचा समतोल राखणे
- नागरी संस्था व्यवस्थापन आणि मानवी मूल्यांना प्रोत्साहन
- मानव विकासामध्ये नागरी संस्थांची भूमिका, अभिनवता
- तंत्रज्ञानाचे प्रवर्तक म्हणून नागरी संस्थांची भूमिका