जागतिक वन्यजीव दिन; वाघ, बिबट्याची कातडी, सापाचे विष अन् व्हेल माशाच्या उलटीचाही तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 08:00 AM2023-03-03T08:00:00+5:302023-03-03T08:00:11+5:30

Nagpur News वाघ, बिबट्याची कातडी, हरणाचे मांस, सापाचे विष किंवा व्हेल माशाच्या उलटीपर्यंतची (स्पर्म व्हेल) प्रकरणे प्रयाेगशाळेत तपासली जात असून, त्यामुळे राज्य वनविभागाला मदत हाेत आहे.

World Wildlife Day; Also investigated tiger, leopard skin, snake venom and whale vomit | जागतिक वन्यजीव दिन; वाघ, बिबट्याची कातडी, सापाचे विष अन् व्हेल माशाच्या उलटीचाही तपास

जागतिक वन्यजीव दिन; वाघ, बिबट्याची कातडी, सापाचे विष अन् व्हेल माशाच्या उलटीचाही तपास

googlenewsNext
ठळक मुद्देफाॅरेन्सिक प्रयाेगशाळेने दिली वनगुन्हे तपासाला गती वर्षभरात शंभरावर संवेदनशील प्रकरणे

निशांत वानखेडे

नागपूर : राज्य शासनाच्या न्यायवैद्यकशास्त्र प्रयाेगशाळेने वनगुन्ह्यांच्या तपासाला गती मिळाली आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील वनविभागाच्या शंभरावर संवेदनशील प्रकरणात प्रयाेगशाळेचा अहवाल महत्त्वाचा ठरला आहे. वाघ, बिबट्याची कातडी, हरणाचे मांस, सापाचे विष किंवा व्हेल माशाच्या उलटीपर्यंतची (स्पर्म व्हेल) प्रकरणे प्रयाेगशाळेत तपासली जात असून, त्यामुळे राज्य वनविभागाला मदत हाेत आहे.

वन्यप्राण्यांचे मांस, कातडी किंवा हाडांचे सांगाडे सापडले की त्यांचा तपास हे वनविभागासाठी आव्हानच असते. मग ते कातडे वाघाचे की बिबट्याचे, पकडलेले मांस माेराचे की हरिणीचे, सापडलेल्या हाडाचे सांगाडे काेणत्या प्राण्याचे, त्याचा मृत्यू कसा झाला, याचा तपास करतानाच वनविभागाचे वर्ष निघून जायचे. कारण अशा प्रकरणांचा तपास करणारी प्रयाेगशाळा महाराष्ट्रात नव्हतीच. या वन्यजिवांचे नमुने भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून किंवा हैदराबादला पाठविले जायचे. त्याचा अहवाल यायला दाेन-दाेन वर्षे आणि त्यावरून गुन्हे दाखल करायला पाच-पाच वर्षे लागायची. ताेवर पकडलेले आराेपीही सुटून दुसरे गुन्हे करायला माेकळे व्हायचे. ऑक्टाेबर २०२१ मध्ये नागपुरात न्यायवैद्यक शास्त्र प्रयाेगशाळेत वन्यजीव प्रयाेगशाळा जाेडण्यात आली आणि तपासाला गती मिळाली. अगदी तितर-बटेर शिकारीच्या प्रकरणातही प्रयाेगशाळेची मदत हाेत आहे.

व्हेल माशाच्या उलटीची किंमत दाेन काेटी रुपयांच्या घरात असते. अशाप्रकारची तीन प्रकरणे प्रयाेगशाळेत प्राप्त झाली. ‘मायटाेकाॅन्ड्रियल डीएनए’ तपासातून त्यातील सत्य काढणे शक्य हाेत आहे. वनविभागाकडून प्रयाेगशाळेत १०० हून अधिक केसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ५० टक्के प्रकरणात अहवाल विभागाला सादर केला आहे. या प्रयाेगशाळेमुळे खर्च, वेळ व कर्मचाऱ्यांचा त्रासही वाचला असल्याचे सांगितले जात आहे.

लवकरच केंद्रस्थळाची प्रयाेगशाळा

सध्या प्रयाेगशाळेचे उपसंचालक असलेले डाॅ. विजय ठाकरे यांच्या प्रयत्नाने वन्यजीव प्रयाेगशाळा येथे सुरू झाली. ज्यामुळे महाराष्ट्राच्या वनगुन्हे तपासाला गती मिळाली. आता येथे डेहराडूनप्रमाणे केंद्रस्तराची प्रयाेगशाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मूलभूत साेयी-सुविधांची पायाभरणी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील प्रकरणांचा तपासही येथे करणे शक्य हाेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूरच्या धर्तीवर छत्तीसगडमध्ये वन्यजीव फाॅरेन्सिक प्रयाेगशाळा सुरू हाेत असून, नुकतेच तेथील कर्मचाऱ्यांनी येथे प्रशिक्षणही घेतले. डाॅ. ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून तेथील प्रयाेगशाळेची पायाभरणी हाेत आहे.

Web Title: World Wildlife Day; Also investigated tiger, leopard skin, snake venom and whale vomit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.