जागतिक वन्यजीव दिवस विशेष; २०० वर वाघांचा शिकाऱ्यांनी घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 07:00 AM2022-03-03T07:00:00+5:302022-03-03T07:00:12+5:30
Nagpur News २०१२ ते २०२० या आठ वर्षांत ८५७ पैकी १९३ वाघ शिकारीत मारले गेले आणि मागील दाेन वर्षांत त्यात भर पडली आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : मागील काही वर्षांत वाघांची संख्या वाढण्यासह व्याघ्र शिकारीवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र, मागील १० वर्षांचे आकडे पाहता २०० च्यावर वाघांचे बळी शिकाऱ्यांनी घेतले आहेत. २०१२ ते २०२० या आठ वर्षांत ८५७ पैकी १९३ वाघ शिकारीत मारले गेले आणि मागील दाेन वर्षांत त्यात भर पडली आहे. भारतात वन्यजीवांच्या निसर्गचक्रात वाघ हा प्रमुख घटक असल्याने त्याचे महत्त्व कायम अधाेरेखित हाेत आले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०२२ दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी १००८ वाघांचा मृत्यू झाला. २०२० पर्यंत ४१७ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने या काळात १०८ वाघांचा बळी गेला. ४४ अनैसर्गिक तर ७३ वाघ उपचारादरम्यान मृत पावले. २०२० पर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या आत ४७८ म्हणजे ५५.७८ टक्के वाघांचा जीव गेला. व्याघ्र प्रकल्पाबाहेर २७१ म्हणजे ३१.६२ टक्के, तर १२.६० टक्के विजेच्या धक्क्याचे बळी ठरले. एकूण मृत्यूंपैकी ८८.९१ टक्के प्रकरणे शवविच्छेदन व फाॅरेन्सिक अहवालानंतर बंद करण्यात आली असून, ११.०९ टक्के प्रकरणे प्रलंबित असल्याचा एनटीसीएचा अहवाल आहे.
महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
२०१२ ते २०२२ पर्यंत दहा वर्षांत झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक २५० व्याघ्र मृत्यू मध्य प्रदेशात झाले. त्यापाठाेपाठ १७४ मृत्यूंसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक वाघ या दाेन राज्यांतच आहेत, हेही विशेष. त्यानंतर कर्नाटक १२७, उत्तराखंड ९३, तामिळनाडू ६२ व आसाम ६० या राज्यांचा क्रमांक लागताे.
२०२२ च्या दाेन महिन्यांत २४ मृत्यू
२०२१ साली देशभरात १२७ वाघ मरण पावले हाेते. त्यापैकी ४२ मध्य प्रदेश व २७ महाराष्ट्रात हाेते. २०२२ मध्ये आतापर्यंत दाेन महिन्यांत २४ वाघांचे मृत्यू झाले. यात दाेन्ही राज्यात प्रत्येकी ६ बळी गेले. क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार ताडाेबा अंधारी प्रकल्पात आठ वर्षांत १८ मृत्यू, पेंच महाराष्ट्रात १२, मेळघाटात ११ व नवेगाव नागझिरा अभयारण्यात २ मृत्यूची नाेंद आहे.