जागतिक योग दिन; सदा सर्वदा ‘योग’ असा घडावा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:07 AM2018-06-21T11:07:14+5:302018-06-21T11:07:24+5:30
योग ही प्राचीन भारतीय संस्कृतीकडून मनुष्याच्या सुदृढ आरोग्यासाठी मिळालेली बहुमूल्य भेट ठरली आहे. म्हणूनच युनोनीही योगाचे महत्त्व स्वीकारून जागतिक स्तरावर यास स्थान दिले आहे.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : योग ही प्राचीन भारतीय संस्कृतीकडून मनुष्याच्या सुदृढ आरोग्यासाठी मिळालेली बहुमूल्य भेट ठरली आहे. म्हणूनच युनोनीही योगाचे महत्त्व स्वीकारून जागतिक स्तरावर यास स्थान दिले आहे. योग आरोग्याच्या दृष्टीने तर लाभदायक आहेच, मात्र मुलांची स्मृती आणि बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठीही योगाचे महत्त्व आहे. प्रत्यक्ष निरीक्षणावरून ही नोंद करण्यात आली आहे. डॉ. संजय खळतकर यांनी ही नोंद करून राष्टÑसंत तुकडोजी महाविद्यालयातून आचार्य (पीएचडी) पदवी प्राप्त केली आहे. डॉ. खळतकर यांनी १४ वर्षांपूर्वी हा प्रबंध विद्यापीठात सादर केला आहे.
डॉ. संजय खळतकर हे संताजी महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाचे प्राध्यापक आहेत. योगाबाबत त्यांना सुरुवातीपासूनच आवड होती. विद्यार्थ्यांना शिकविताना ते योगाला विशेष महत्त्व देत होते. योग ही संकल्पना मनुष्याच्या निर्मितीसाठी आहे. त्यामुळे माणसाचा सर्वांगिण विकास होतो व सुखशांती प्राप्त होते. त्यामुळे योग ही सर्व लोकांची जीवनप्रणाली व्हावी, असे त्यांना वाटते. मुलांना शिकविताना आपण या विषयात पीएचडी प्राप्त करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी विद्यापीठातील रीतसर प्रक्रिया पूर्ण केली. ‘मुलांच्या स्मृती आणि बुद्धिमत्तेवर योगाचे परिणाम’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. डॉ. अनिल करवंदे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी हा प्रबंध पूर्ण केला.
त्यांनी सांगितले, प्रबंध पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षणाचा उपयोग केला. आम्ही सातव्या वर्गातील ६० मुलांची निवड केली. त्यातील ३० मुलांना नियमितपणे प्राणायामचे सर्व प्रकारचे व्यायाम करायला सांगितले व उर्वरित ३० मुलांना काहीच करू दिले नाही. सहा महिने हे अवलोकन करण्यात आले. ज्या मुलांनी प्राणायाम केले, त्या मुलांच्या स्मृती आणि बुद्धिमत्तेत पूर्वीपेक्षा वाढ झाल्याचे आढळून आली. २००२ साली हे निरीक्षण प्रबंधात सादर केले व विद्यापीठातर्फे २००४ ला आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी हे अष्टांगयोग पूर्ण करणारी व्यक्ती निश्चितच चांगले व्यक्तिमत्त्व प्राप्त करू शकते, असे मत डॉ. खळतकर यांनी व्यक्त केले. योग शरीरातील लहानमोठे रोग निवारणासाठीही लाभदायक आहे. योग कालचा वारसा, आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे, त्यामुळे सर्वांनी याचा स्वीकार करावा, अशी भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
७५ व्या वर्षी योग विषयात पीएचडी घेणारे विठ्ठलराव
ज्यांना काही तरी शिकण्याची जिद्द आहे, त्यांना कधीच वयाचे बंधन नसते. योग प्रचार-प्रसारासाठी जीवन वाहिलेले विठ्ठलराव जीभकाटे हे त्यातीलच एक प्रेरक उदाहरण. लहानपणापासून अभावग्रस्त जीवन जगलेले हे व्यक्तिमत्त्व. पण एक गोष्ट त्यांच्याकडे होती, ती म्हणजे योगाविषयीची प्रचंड आवड. परिस्थितीचे धक्के सहन करीत कसेतरी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना कृषी विभागात नोकरी मिळाली. उपजीविकेचे साधन मिळाले होते. यावेळीही त्यांचा योगाचा प्रचार-प्रसार सुरूच होता. त्यावेळी योगाकडे लोक गंभीरतेने पाहत नव्हते. मात्र त्यांनी योगप्रचाराचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले. यादरम्यान बारावीनंतरचे शिक्षण घेण्याचा विचार त्यांच्या डोक्यातही आला नाही. मात्र नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्याची जाणीव त्यांना झाली. ६० वर्षांनंतर त्यांनी बीए व समाजशास्त्र विषयात एमए पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी विद्यापीठात योग विषयातून पीएचडी घेण्यासाठी अर्ज केला. ‘सामाजिक दृष्टिकोनातून योग’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यावेळी समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. प्रदीप आगलावे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी हा प्रबंध सादर केला. त्यांना योग विषयात विद्यापीठातर्फे पदवी प्रदान करण्यात आली, तेव्हा त्यांचे वय होते ७५ वर्षे. तरुणांनाही लाजवेल, अशी जिद्द आणि कर्तृत्व त्यांनी दाखवून दिले.