जागतिक योग दिवस; नितीन गडकरी यांची योगसाधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:48 AM2019-06-21T10:48:32+5:302019-06-21T10:49:37+5:30
जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका व नेहरू युवा केंद्रातर्फे यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग व अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका व नेहरू युवा केंद्रातर्फे यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग व अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली.
नागपुरातील योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे व अन्य पदाधिकाऱ्यांसह गडकरी यांनी विविध योगप्रकार केले. सकाळी ५.४५ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्र
मात उपस्थितांनी योगासनांचे अनेक प्रकार सादर केले. यात लहान मुलांसह अनेक वयोवृद्ध योगाभ्यासी मोठ्या संख्येने हजर झाले होते.
जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाविषयी थोडेसे..
कोकणातील सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेले जनार्दनस्वामी हे वेद, उपनिषद, पुराण, यज्ञविधी, आयुर्वेद व ज्योतिषाचार्यात विद्वान. पण त्यांच्यात होता वैराग्यभाव. पुढे काशी व हिमालयात जाऊनही त्यांनी ज्ञान मिळविले. नर्मदेची परिक्रमा करताना त्यांची एका योगगुरूशी भेट झाली व त्यांच्याकडून योगाचे ज्ञान घेतले. याच गुरूने आयुष्यभर नि:शुल्क, नि:स्वार्थपणे समाजपर्यंत जाऊन योगप्रचार करण्याची गुरुदक्षिणा स्वामींकडून मागितली व त्यांनीही इतर सर्व ज्ञान सोडून योग प्रचाराचा मार्ग स्वीकारला. प्रचारासाठी फिरता फिरता ते अमरावतीहून नागपूरला पोहचले व पुढे येथेच त्यांनी आपल्या कार्याचे केंद्र बनविले. त्यावेळी योगाबाबत लोकांना ज्ञान नव्हते. अशावेळी स्वामींनी घरोघरी जाऊन योगाचा प्रचार केला. त्यांनी आजारी व्यक्तींना निवडले व योगसाधनेतून त्यांना बरे केले. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने जनमानसही प्रभावित झाला व त्यांच्याशी जुळत गेला. १९४९ साली त्यांनी नियमित योगवर्ग सुरू केले व १९५१ साली त्यांनी मध्य प्रांत योगाभ्यासी मंडळ ही नोंदणीकृत संस्था स्थापन केली. १९५६ पासून योगाची परीक्षा घेणे सुरू केले व पुढे योग संमेलन भरविण्यास सुरुवात केली. ते आणि एक थैली हेच त्यांचे प्रचार कार्यालय होते. पुढे १९६६ मध्ये त्यांच्या कार्याने प्रभावित होत रामनगर येथील महिलांची संस्था त्यांच्या मंडळाशी विलीन झाली. १९६७ साली स्वामीजींच्या अमृत महोत्सवाच्या वेळी योगाचा बौद्धिक प्रचार करण्यासाठी ‘योगप्रकाश’ या मासिकाला सुरुवात झाली. अनेक लेखक यामध्ये योगाची महिमा लिहू लागले. राज्य शासनाने छत्रपती पुरस्काराने जनार्दनस्वामी यांचा गौरव केला. २ जून १९७८ साली जनार्दनस्वामी यांनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीची प्रेरणा घेत असंख्य लोक या मंडळाच्या कार्याशी जुळले.
मंडळाचा विस्तार संपूर्ण राज्यात झाला आहे. ४० हजार सक्रिय साधक आणि ४०० तज्ज्ञ प्रशिक्षक नि:शुल्क मंडळाच्या कामात सेवा देत आहेत. या मंडळाने खºया अर्थाने योगाचे महत्त्व आबालवृद्धांच्या मनामनात प्रवाहित केले आहे.