जागतिक युवा कौशल्य दिन; ‘आयटीआय’मध्ये रचला जातोय कौशल्य विकासाचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:13 PM2019-07-15T12:13:11+5:302019-07-15T12:14:54+5:30
जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. हे बदल आत्मसात करून भविष्यातील तांत्रिक बदलाना अनुकूल ठरणारी पिढी घडविण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. हे बदल आत्मसात करून भविष्यातील तांत्रिक बदलाना अनुकूल ठरणारी पिढी घडविण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) करीत आहे. उद्योगाचा आत्मा समजल्या जाणारे कारागीर घडविण्यासाठी राज्यात कार्यरत असलेल्या या संस्थांना विद्यार्थ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळतो आहे.
सद्यस्थितीत पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्याचबरोबर तांत्रिक व्यावसायिक शिक्षण महागडे झाले आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) रोजगार व स्वयंरोजगारासाठी वरदान ठरत आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरूपातील तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारचे मेक इन इंडिया व महाराष्ट्र सरकारचे मेक इन महाराष्ट्रासारख्या उद्योग व सेवा क्षेत्रांसाठी प्रोत्साहन योजनांमुळे अधिक प्रमाण उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास होत आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. ४६ टक्केहून अधिक तरुण आपल्या देशात आहेत, ही संख्या जगाच्या इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. त्यामुळेच जग भारताकडे कुशल मनुष्य बळासाठी पाहत आहे.
उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून यासाठी सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करून देशाच्या विकासात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
आजमितीला राज्यात ४१७ शासकीय व ४०० खासगी आयटीआय आहे. या दोन्ही मध्ये १,३७,३०० जागा आहे. या संस्थांमध्ये एक वर्ष ते दोन वर्षे कालावधीचे विविध ७९ प्रकारचे व्यवसायांचे (अभ्यासक्रम) प्रशिक्षण दिले जाते. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या या संस्थेला गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षी राज्यातील २ लाख ५८ हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.
महिलांनाही मोठी संधी
आयटीआय आता पुरुषांचीच मक्तेदारी राहिली नाही. यात महिलांनाही मोठी संधी आहे. आयटीआयमधील एकूण जागेच्या ३० टक्के जागा मुलींसाठी आरक्षित आहे. विशेष म्हणजे अनेक उद्योगांनी स्त्रियांना प्राध्यान्य दिले आहे. त्या सक्षमतेने कर्तव्य बजावत आहे.
उद्योगांचा आत्मा घडविणाऱ्या संस्था
पूर्वी आयटीआयमध्ये ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा कमी गुणवत्तेचे विद्यार्थी प्रवेश घ्यायचे. पण आज आयटीआयमध्ये शेवटचा विद्यार्थी ६० टक्के गुण मिळविलेला आहे. त्यामुळे आयटीआयमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. एवढेच नव्हे तर पॉलिटेक्निक व इंजिनीअरींगचे विद्यार्थीसुद्धा आयटीआयमध्ये प्रवेश घेत आहेत. आयटीआयचा अभ्यासक्रम हा उद्योगधंद्यातील तज्ज्ञांनी बनविलेला असून अभ्यासक्रम बनविताना कारखान्यात वापरल्या जाणाºया कौशल्यांचा विचार करण्यात आला आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे कॅम्पस आज आयटीआयमध्ये होत आहे. त्यामुळे आयटीआय खºया अर्थाने उद्योगांचा आत्मा घडविण्याचे कार्य करीत आहे.
- हेमंत आवारे, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर
मुख्यमंत्री साधणार संवाद
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे पदवीदान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्वत: आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे. याचे लाईव्ह प्रक्षेपण नागपूरच्या आयटीआयमध्येसुद्धा होणार आहे.