जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:14 AM2019-09-07T00:14:58+5:302019-09-07T00:18:16+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. पी. पी. देशमुख यांनी विना शस्त्रक्रिया धमणीवर निर्माण झालेला फुगा अँजिओग्राफीच्या सहकार्याने ‘डिव्हाईस’ बसवून बंद केला. रुग्णाला जीवनदान मिळाले. जगातील या प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका ५२ वर्षीय रुग्णाच्या हृदयाच्या धमणीला मोठा फुगा निर्माण झाला होता. हा फुगा बाजूच्या फुफ्फुसात जाऊन फाटत होता. यामुळे रुग्णाला रक्ताच्या उलट्या व्हायच्या. अशा रुग्णांवर ‘ओपन हार्ट सर्जरी’हाच पर्याय आहे. परंतु गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व दगावण्याची भीती असल्याने रुग्णाने नकार दिला होता. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. पी. पी. देशमुख यांनी या रुग्णावर विना शस्त्रक्रिया धमणीवर निर्माण झालेला फुगा अँजिओग्राफीच्या सहकार्याने ‘डिव्हाईस’ बसवून बंद केला. त्या रुग्णाला जीवनदान मिळाले. जगातील या प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील ५२ वर्षीय शंकर (नाव बदललेले आहे) नावाचा रुग्ण ८ ऑगस्ट रोजी रक्ताच्या उलट्या होतात म्हणून मेडिकलच्या टीबी वॉर्डात भरती झाला. त्यांचा एक्स-रे व सिटी स्कॅन काढला असता उजव्या बाजूच्या हृदयाच्या धामणीला पाच बाय सहा सेमी.चा मोठा फुगा निर्माण झाल्याचे निदान झाले. हा फुगा फुफ्फुसामध्ये जाऊन फाटत असल्याने रुग्णाला रक्तस्राव होत होता. शंकर यांना ‘ओपन हार्ट सर्जरी’चा सल्ला देण्यात आला होता. परंतु ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने व २० टक्के रुग्ण दगाविण्याची भीती असल्याने त्यांनी शस्त्रक्रियेस नकार दिला. शंकर यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागात पाठविण्यात आले. येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पी. पी. देशमुख यांनी त्यांची तपासणी केली. उपचाराचे नियोजन केले. जे ‘डिव्हाईस‘ ‘पीडीए’ नावाचा हृदयातील छिद्र बुजविण्यासाठी वापरले जाते, त्याचा वापर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. डॉ. देशमुख यांनी अॅन्जिओग्राफी करीत त्याच ‘डिव्हाईस’च्या मदतीने हृदयाच्या धमणीवरील फुग्याचे तोंड बंद केले. या शस्त्रक्रियेत त्यांचे कौशल्य व अनुभव महत्त्वाचे ठरले. यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांचे प्राण वाचले. ते बरे होऊन ३ सप्टेंबरला आपल्या घरीही गेले. या शस्त्रक्रियेत डॉ. देशमुख यांना डॉ. संदीप चौरसीया व डॉ. महेंद्र मस्के यांनी मदत केली. शस्त्रक्रियेत कॉर्डिओलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे व डॉ. सुनील वाशिमकर यांनीही मार्गदर्शन केले.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, अशा पद्धतीने केलेली शस्त्रक्रिया आतापर्यंत तरी कुठे वाचण्यात आलेली नाही, किंवा अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेचा कुठे उल्लेखही नाही. म्हणूनच ही शस्त्रक्रिया जगातील पहिली असावी.