लिंबूवर्गीय फळांवरील रोगांवर करता येऊ शकते मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 09:25 PM2019-01-17T21:25:56+5:302019-01-17T21:28:54+5:30
लिंबूवर्गीय पिकांसाठी सर्वात धोकादायक मानण्यात येणाऱ्या ‘सायट्रस ग्रिनींग’ किंवा ‘हुंग्लोंगबिन / एचएलबी’ या रोगावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांना ९५ टक्के यश मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत जागतिक संत्रा महोत्सव सुरू होत असताना विदर्भासह जगभरातील लिंबूवर्गीय फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लिंबूवर्गीय पिकांसाठी सर्वात धोकादायक मानण्यात येणाऱ्या ‘सायट्रस ग्रिनींग’ किंवा ‘हुंग्लोंगबिन / एचएलबी’ या रोगावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांना ९५ टक्के यश मिळाले आहे. संशोधनातील निकाल पाहता लवकरच या रोगावर पूर्णत: नियंत्रण आणले जाऊ शकते. ‘आयसीएआर-सीसीआरआय’ ( सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट), ‘आयआयटी-रुरकी’ व ‘युनिव्हर्सिटीऑफ सेंट्रल फ्लोरिडा’ यांच्या संयुक्त संशोधनातून ही बाब शक्य झाली आहे. विशेष म्हणजे जगभरात पहिल्यांदाच असे पहिलेच यशस्वी पाऊल आहे.
‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डॉ.एम.एस.लदानिया, प्रधान संशोधक डॉ.दिलीप घोष यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
‘सायट्रस ग्रिनींग’ या रोगामुळे लिंबूवर्गीय पिकांचे जगभरात सर्वात जास्त नुकसान झाले. विशेषत: फ्लोरिडासारख्या सर्वात जास्त पिकांच्या ठिकाणी तर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन ६० लाख टनांहून घटले. हा रोग ‘सायट्रस सिल्ला’ या कीटकाद्वारे एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत पसरतो. या रोगावर नियंत्रणासाठी जगभरात एकही प्रभावी औषध उपलब्ध नव्हते. यासंदर्भात ‘आयसीएआर-सीसीआरआय’ ( सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट), ‘आयआयटी-रुरकी’ व ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा’ येथील संशोधकांनी संयुक्तपणे संशोधन सुरू केले. या संयुक्त संशोधनातून ‘२ एस अल्ब्युमिन प्रोटीन’ शोधून काढण्यात आले. भोपळ्याच्या बियांपासून हे प्रथिन प्राप्त झाले. ‘२ एस अल्ब्युमिन प्रोटीन’ व ‘नॅनो झिंक ऑक्साईड’ यांच्या मिश्रणातून ‘स्क्रीन हाऊस’ परिस्थितींमध्ये ‘सायट्रस ग्रिनिंग’ या रोगावर औषधाचा शोध लागला. यासंदर्भातील शोधपत्रिका जागतिक पातळीवरील एका वैज्ञानिक पत्रिकेतदेखील प्रकाशित करण्यात आली. ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा’ येथील डॉ. स्वदेशमुकुल संत्रा, ‘आयआयटी’चे अश्वनी कुमार शर्मा, तसेच ‘सीसीआयआर’मधील डॉ.दिलीप कुमार घोष, सुनील कोकणे, प्रणव कुमार, आशिष वर्घने, मनाली मोटघरे यांचा या संशोधन प्रकल्पात सहभाग होता.
मोसंबी रोपांमध्ये केले प्रथिनांचे प्रत्यारोपण
‘२ एस अल्ब्युमिन प्रोटीन’ व ‘नॅनो झिंक ऑक्साईड’ या जीवाणूविरोधी पदार्थांनी रोगाच्या विरोधात निकाल दिला. त्यानंतर यांचे संयुक्त मिश्रण रोगाची लागण झालेल्या मोसंबीच्या रोपांमध्ये ‘इंजेक्ट’ करण्यात आले. त्यानंतर रोगाचा प्रभाव कमी झाला. सातत्याने ही प्रक्रिया राबविल्यानंतर चार महिन्यांनी ‘ग्रीनिंग’ जीवाणूंचा प्रभाव ९५ टक्क्यांहून कमी झाला. जगभरातील लिंबूवर्गीय पिकांचे उत्पादन कमी करणाऱ्या या रोगावर नियंत्रणाचा एक उपाय म्हणून याला विकसित करता येऊ शकते, असे डॉ.दिलीप घोष यांनी सांगितले.
आता प्रयोगाची चौकट वाढविणार
संशोधकांना हे निकाल प्रयोगशाळेत मिळाले आहेत. मात्र खऱ्या अर्थाने याचा प्रभाव तपासायचा असेल तर प्रत्यक्ष जमिनीवर याचा प्रयोग होणे आवश्यक आहे. नागपुरातच याचे ‘पायलट टेस्टिंग’ करण्यात येईल. साधारणत: दोन वर्ष यावर लक्ष ठेवण्यात येईल. तीन ते चार वर्षात नेमके निकाल समोर येतील. या शोधाच्या अमेरिकन ‘पेटंट’ नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला असल्याची माहिती डॉ.एम.एस.लदानिया यांनी दिली.