चिंताजनक! ओमायक्रॉनने घेतली डेल्टा व्हेरिएंटची जागा; राज्यासाठी धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 08:05 AM2022-01-14T08:05:45+5:302022-01-14T08:06:00+5:30
९ जानेवारी रोजीदेखील ‘नीरी’त ५३ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले.
-मेहा शर्मा
नागपूर : राज्यातील बहुतांश कोरोनाबाधित डेल्टा व्हेरिएंटचे असल्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी नागपुरातील ‘नीरी’च्या आकडेवारीमुळे या दाव्याला धक्का बसला आहे. ‘नीरी’ने केलेल्या ‘जीनोम सिक्वेन्सिंग’चा दुसरा अहवाल गुरुवारी समोर आला व त्यातील सर्व कोरोनाबाधितांना ‘ओमायक्रॉन’चाच संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे.
‘नीरी’ने मागील आठवड्यात ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ची सुरुवात केली. ‘नीरी’ने ७ ते १० जानेवारी या कालावधीत कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी ७३ ओमायक्रॉनने घेतली डेल्टा व्हेरिएंटची जागा जणांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले. गुळणीवर आधारित ‘डब्लूजीएस’ (व्होल जीनोम सिक्वेन्सिंग) या प्रणालीचा यात उपयोग करण्यात आला. त्यातील सर्व ७३ नमुने ओमायक्रॉनबाधित निघाले.
९ जानेवारी रोजीदेखील ‘नीरी’त ५३ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले. त्यातील ५१ नमुने ओमायक्रॉनबाधित असल्याचे आढळले. या दोन्ही ‘सिक्वेन्सिंग’मध्ये एकूण नमुन्यांपैकी ९८.४१ टक्के नमुने ओमायक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब निश्चितच प्रशासन व वैद्यकीय यंत्रणांची झोप उडविणारी आहे. ‘डब्लूजीएस’ प्रक्रिया जास्त मेहनतीची, वेळ घेणारी आणि महाग आहे. त्यामुळेच काही निवडक नमुन्यांचे या प्रक्रियेतून सिक्वेन्सिंग करण्यात आले. ‘जीनोम सिक्वेन्सिंग’च्या अहवालाचा कालावधी पाच वरून दोन दिवसांवर आला आहे.