चिंताजनक, बाधितांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:06 AM2021-04-29T04:06:28+5:302021-04-29T04:06:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन दिवस बाधितांपेक्षा बरे झालेल्या संख्या जास्त असल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. मात्र बुधवारच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवस बाधितांपेक्षा बरे झालेल्या संख्या जास्त असल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. मात्र बुधवारच्या अहवालात बाधितांची संख्या वाढलेली दिसून आली. २४ तासात जिल्ह्यामध्ये ८५ मृत्यूंची नोंद झाली तर साडेसात हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले सद्यस्थितीत जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण असून गुरुवारी एकूण पॉझिटिव्हची संख्या चार लाखांपार जाण्याची शक्यता आहे.
बुधवारी जिल्ह्यामध्ये ७ हजार ५०३ बाधित आढळले. यातील ४ हजार ८०३ शहरातील तर २ हजार ६९० ग्रामीण भागातील होते. शहरात ३७, ग्रामीणमध्ये ३८ तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण २६ हजार ५२५ चाचण्या झाल्या. यातील १९ हजार २४२ शहरात तर ७ हजार २८३ ग्रामीण भागात झाल्या. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७७ हजार १८७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यात शहरातील ४६ हजार ३५३ तर ग्रामीणमधील ३० हजार ८३४ रुग्णांचा समावेश आहे. सक्रिय रुग्णांपैकी ६० हजार ६६० जण होम आयसोलेशनमध्ये असून १६ हजार ५२७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
एकूण पॉझिटिव्ह चार लाखांजवळ
आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ३ लाख ९३ हजार ८३० बाधित आढळून आले. तर ७ हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात ४ हजार ३९२ तर ग्रामीणमध्ये १ हजार ७८१ रुग्णांचा मृत्यू झाला. १ हजार ३८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते.
सुमारे सात हजार कोरोनामुक्त
बुधवारी जिल्ह्यातील ६ हजार ९३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ४ हजार ५८५ रुग्ण शहरातील तर २ हजार ३५० ग्रामीण भागातील आहेत.