अमेरिकन अधिकाऱ्यांचे संघस्थानी नमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 08:44 PM2020-02-06T20:44:50+5:302020-02-06T20:45:31+5:30
२०१४ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचे महत्त्व वाढले असून अनेक मान्यवरांची पावले इकडे वळल्याचे दिसून आले. अगदी विदेशातील राजदूतदेखील संघाबाबत जाणून घेताना दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१४ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचे महत्त्व वाढले असून अनेक मान्यवरांची पावले इकडे वळल्याचे दिसून आले. अगदी विदेशातील राजदूतदेखील संघाबाबत जाणून घेताना दिसून येत आहेत. गुरुवारी तर चक्क अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली व संघस्थानी नमनदेखील केले. विशेष म्हणजे स्मृतिमंदिरात येण्याअगोदर त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या महाल येथील निवासस्थानीदेखील भेट दिली.
सकाळी १० च्या सुमारास मुंबईतील अमेरिकन दूतावासातील ‘कॉन्सुल जनरल’ डेव्हिड रॅन्झ रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया व कार्यवाह अरविंद कुकडे यांनी त्यांचे स्वागत केले. रॅन्झ यांनी डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी संघाची कार्यपद्धती, सेवाकार्य, विविध प्रकल्प इत्यादींची माहिती जाणून घेतली. सुमारे दोन तास ते रेशीमबागेत होते व १२.१५ वाजता तेथून रवाना झाले. त्यांच्या समवेत ‘व्हाईस कॉन्सुल’ रॉबर्ट पॉल्सन हेदेखील होते. डेव्हिड रॅन्झ यांनी संघाच्या विविध प्रकल्पांबाबत आस्थेने जाणून तर घेतलेच. शिवाय संघाकडून स्वयंसेवक कशा पद्धतीने घडविण्यात येतात याचीदेखील विचारणा केली, असे राजेश लोया यांनी सांगितले. डेव्हिड रॅन्झ हे पहिल्यांदाच नागपुरात आले होते हे विशेष.
विदेशातील राजदूतांनी अगोदरदेखील दिली भेट
मागील वर्षी जुलै महिन्यात भारतातील जर्मन राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती. तसेच सिंगापूरचे ‘कॉन्सुल जनरल’ केव्हिन च्ये यांनीदेखील स्मृतिमंदिराला भेट दिली होती. २०१५ साली युरोपियन युनियनचे शिष्टमंडळ संघस्थानी आले होते.