नागपुरात भेसळयुक्त ९२ हजारांचे खाद्यतेल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 08:57 PM2018-09-25T20:57:10+5:302018-09-25T21:01:01+5:30
सणासुदीत भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री वाढली आहे. जास्त भाव देऊनही फसवणूक होत असल्यामुळे ग्राहकांची ओरड वाढली आहे. त्यामुळे बाजारात शासनातर्फे तेल आणि खाद्यान्नाची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने इतवारीतील एका खाद्यतेल विक्रेत्याचे दुकान आणि गोदामावर धाड टाकून भेसळयुक्त ९२ हजार रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सणासुदीत भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री वाढली आहे. जास्त भाव देऊनही फसवणूक होत असल्यामुळे ग्राहकांची ओरड वाढली आहे. त्यामुळे बाजारात शासनातर्फे तेल आणि खाद्यान्नाची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने इतवारीतील एका खाद्यतेल विक्रेत्याचे दुकान आणि गोदामावर धाड टाकून भेसळयुक्त ९२ हजार रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त केले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अभय देशपांडे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे २९ आॅक्टोबरला नेहरू पुतळा, तेलीपुरा, इतवारी येथील न्यू लक्ष्मी आॅईल स्टोअर्समध्ये आणि गोदामावर एकाचवेळी धाड टाकली. स्टोअर्सचे मालक वासुदेव खंडवानी हे नामांकित कंपनी फॉर्च्युन, किंंग्ज, आधार या कंपनीचे रिकामे टीन खरेदी करून त्यामध्ये निम्न प्रतिचे आणि भेसळयुक्त खाद्यतेल भरून त्यावर बनावट टिकलीद्वारे सिलपॅक करीत होते. खाद्यतेल नामांकित कंपनीचे असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करून खाद्यतेलाची विक्री करीत असल्याचे आढळून आले.
स्टोअर्समधून १६,९४८ रुपये किमतीचे २०८ किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल (खुले), १३,२६९ रुपये किमतीचे १२ टीन (प्रति टीन १५ किलो) रिफाईन्ड सोयाबीन तेल (किंग्ज), ६१,९२० रुपये किमतीचे ४६ टीन रिफाईन्ड सूर्यफूल तेल (आधार) असे एकूण ९२,०२८ किमताची साठा जप्त करण्यात आला. या साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणास्तव घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यात आला आहे. नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे नागपूर विभागीय सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे आणि प्रफुल्ल टोपले यांनी केली.
सणासुदीच्या दिवसांचा विचार करता खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग नागपूरतर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास विभागाच्या कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहन शशिकांत केकरे यांनी केले आहे.