५५० कोटींची जमीन नागपूर मनपा मेट्रोला हस्तांतरित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:44 AM2018-12-12T00:44:17+5:302018-12-12T00:45:44+5:30
नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८ हजार ६८० कोटी आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. यात महापालिका व नासुप्रला प्रत्येकी पाच टक्के वाटा उचलावयाचा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिका ५५० कोटींची जमीन मेट्रोला हस्तांतरित करणार आहे. यातील ६६ कोटींची जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८ हजार ६८० कोटी आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. यात महापालिका व नासुप्रला प्रत्येकी पाच टक्के वाटा उचलावयाचा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिका ५५० कोटींची जमीन मेट्रोला हस्तांतरित करणार आहे. यातील ६६ कोटींची जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे.
मेट्रोला रक्कम देणे शक्य नसल्याने महापालिकेने मेट्रो कॉरिडोरमधील आपल्या मालिकीच्या जमिनी मेट्रोला देऊ केल्या. आतापर्यंत मेट्रो मार्ग, स्टेशन, पॉवर स्टेशनसाठी जमिनी हस्तांतरित केल्या आहेत. मेट्रोने त्या जमिनीची किंमत बाजार मूल्यानुसार ६६ कोटी रुपये आकारली आहे. महापालिकेला मेट्रो प्रकल्प उभारणीत रक्कम देणे शक्य नसल्याने महापालिका आणखी काही जमिनी मेट्रोला देणार आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने प्रकल्पाचा खर्च ११ हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. वाटा वाढणार असल्याने त्यावर उपाय म्हणून महापालिकेने ज्या भागातून मेट्रो जात आहे, त्या भागातील महापालिकेचे बाजार किंवा मोडकळीस आलेल्या शाळा आणि इतर कार्यालयाची जागा महामेट्रोला देण्याचे ठरवले आहे. काही जमिनी हस्तांतरित झाल्या आहेत, तर काही प्रस्तावित आहेत.
महापालिका मेट्रोला ३० वर्षांकरिता भाडेपट्टीवर अनेक भूखंड देणार आहेत. ते विकसित करून मेट्रो त्यातून उत्पन्न घेईल. त्यात महापालिकेचा ५० टक्के वाटा राहील. खोवा मार्केट, संत्रा मार्केट ते कॉटन मार्केटची सुमारे ७० एकर जमीन दिली जाणार आहे. तेथे मेट्रो खोवा मार्केट,संत्रा मार्केट विकसित करेल. ही जागा सुमारे ४०० कोटीची आहे. याशिवाय नेताजी मार्केटची सुमारे तीन एकर जमीन मेट्रोला हस्तांतरित केली जाईल. येथेदेखील मार्केट विकसित केले जाईल. ही सुमारे ६० ते ७० कोटीची जमीन आहे. मेट्रोच्या ४८ किमीच्या पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण कॉरिडोरमध्ये सुमारे ८०० कोटीची जमीन मेट्रोला दिली जाणार आहे. मेट्रो रेल्वे, मेट्रो स्टेशन आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स तयार केले जातील. तसेच लंडनस्ट्रिटदेखील मेट्रोला विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे.
सहा एकर जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स
महापालिकेने आतापर्यंत मेट्रोला १०७०९.५६ चौरस मीटर जमीन हस्तांतरित केली आहे. या जमिनीची किंमत ६६.६३ कोटी रुपये आहे. स्थलांतरित झालेल्या अनेक भूखंडाचे बाजारभावानुसार मूल्यांकन व्हायचे आहे. महापालिकेने आतापर्यंत ६६ कोटीपेक्षा जास्त जमीन दिली आहे. नासुप्रनेदेखील अनेक भूखंड मेट्रोला हस्तांतरित केले आहे. अंबाझरी तलावासमोर सुमारे सहा एकर जागेवर मेट्रो शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारत आहे.