संमेलनाध्यक्ष होणे आवडेल पण...!
By Admin | Published: September 2, 2015 04:31 AM2015-09-02T04:31:59+5:302015-09-02T04:31:59+5:30
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही
नागपूर : साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला सन्मानाने मिळाले नाही म्हणून मी संमेलनाच्या विरोधात बोलतो, असे काहीही नाही. हा आरोप निराधार आहे. साहित्य संमेलन आयोजित क रणारे लोक ते करीत असतात, त्यांनी ते करीत राहावे. शौचालय नसेल तेथे लोक उघड्यावरच विधी आटोपणार ना. पण तरीही मला संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्याची अटच टाकली आणि विनंती, आग्रह झालाच तर मला संमेलनाध्यक्ष व्हायला आवडेल. पण ते संमेलन अखेरचे असले पाहिजे. अखेरच्या संमेलनाचे अध्यक्ष व्हायला मला आवडेल, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
एका चर्चासत्रासाठी नागपुरात आले असताना ते बोलत होते. साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर कुणी करीत असेल तर असे म्हणणारे लोक किती भित्रे आहेत, ते समजून घेण्याची गरज आहे. मी साधा, सरळ माणूस आहे. पण दहशतवादी म्हणून त्यांनी माझे महत्त्वच वाढविले आहे.
महाराष्ट्र भूषणचा विरोध तात्त्विक
४बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्र भूषण देण्यास आपण विरोध केला. तो व्यक्तीविरोध नव्हता. हा विरोध वैचारिक होता. बाबासाहेबांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रातून ते मुस्लीम विरोधी असल्याचे चित्र निर्माण होते. प्रत्यक्षात महाराजांच्या विश्वासातले आणि मोठ्या पदांवरचे सेनापती, मित्र मुस्लीमच होते. या पुरस्काराने चुकीचा संदेश समाजात जाऊ नये म्हणून विरोध केला. इतिहास चुकीचा सांगितला गेला तर देश धार्मिक आधारावर पुन्हा विभाजनाच्या वाटेवर जाईल. ही काळजी आपण का घेऊ नये? असा प्रश्न त्यांनी केला. दाभोलकर, पानसरे आणि आता कर्नाटकातील मलेशप्पा एम. कलबुर्गी यांची हत्या यामागे काही षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सरकारची दिवाळखोरीच आहे. हे तालिबान आहे की पाकिस्तान. मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का? तत्कालीन गांधी, फुले, आंबेडकरांचे विचारही लोकांना पटले नव्हते पण त्यांच्याच विचारातून क्रांती झाली, हे नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्याशिवाय त्यांचे वेतनच द्यायला नको, असे नेमाडे म्हणाले.