पुढील जन्मीही ट्रान्सजेंडरच व्हायला आवडेल.. ; ह्यूमन लायब्ररीत ट्रान्सवूमनचे आत्मकथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 08:53 PM2023-04-17T20:53:37+5:302023-04-17T20:54:02+5:30
Nagpur News रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या एप्रिल महिन्याच्या सत्रात रविवार १६ एप्रिल रोजी दोन ह्यूमन पुस्तकांचे वाचन करण्यात आले.
नागपूरः रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या एप्रिल महिन्याच्या सत्रात रविवार १६ एप्रिल रोजी दोन ह्यूमन पुस्तकांचे वाचन करण्यात आले.
यात पहिले पुस्तक हे, शाश्वत ग्लोबल विलेज स्कूल चालवणारे सचिन व भाग्यश्री देशपांडे होते. मोठ्या कंपन्यांमधील उच्चपदाची नोकरी सोडून अर्थपूर्ण जगण्याचा शोध घेत, सावनेरजवळच्या एका खेड्यातील शाळा चालवणाऱ्या या दांपत्याने आपला प्रवास कथन केला.
शाळा सुरू करण्यामागची प्रेरणा, त्यातील विविध टप्पे, अडथळे, संकटे व केलेले विविध प्रयोग त्यांनी विशद केले.
शाळेत चाकोरीबद्ध शिक्षण न देता, वेगळे प्रयोगशील, सृजनशील शिक्षण रुजवतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. यात, विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा गणित हा विषय आपण कबड्डी या खेळाच्या माध्यमातून कसा शिकवतो, याचे उदाहरण त्यांनी दिले.
रूबरूत सादर झालेले दुसरे पुस्तक होते ट्रान्सजेंडर आंचल वर्मा यांचे.
वयाच्या अडीचव्या महिन्यापासून सुरू झालेला एकटेपणाचा प्रवास पुढे कोणकोणत्या वळणांवर गेला व त्यातून कसा मार्ग काढत आयुष्य अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न होत राहिला हे आंचलने तिच्या कथनातून सादर केले. एका ट्रान्सजेंडरचे आयुष्य पाहताना, ते दुर्दैवी असल्याचा जो समाजरुढ भाव आहे, त्याला नाकारत, आंचलने पुढील जन्मीही ट्रान्सजेंडरच व्हायला आवडेल, असा मनोभाव व्यक्त करून आपल्या अस्तित्वाचा साभिमान स्वीकार दर्शविला.
लोकांची धुणीभांडी व स्वयंपाक करत स्वतःचे पोट भरणे, मुंबईत डान्सबारमध्ये काम करणे, बंगलोरमध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतानाच, दोन जीम यशस्वीपणे चालवून दाखवणे असे आपल्या आयुष्यातील विविधांगी अनुभव तिने सांगितले.
मुंबईत वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एक अनाथ लहान बाळ दत्तक घेऊन तिचे योग्य ते संगोपन करून तिला उच्चशिक्षित करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे सांगितल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट करून तिला कौतुकाची थाप दिली.