भटकलेल्या पाकिस्तानी महिलेला सोपविले संस्थेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:06 AM2018-03-23T01:06:53+5:302018-03-23T01:07:51+5:30
सदाकी दरबार संस्था रायपूर येथे झुलेलाल भगवानच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाकिस्तानातील सिंधी बागडी समाजाच्या महिलेला रेल्वे सुरक्षा दलाने सुखरुप तिच्या सहकारी सेवकांपर्यंत पोहोचविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदाकी दरबार संस्था रायपूर येथे झुलेलाल भगवानच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाकिस्तानातील सिंधी बागडी समाजाच्या महिलेला रेल्वे सुरक्षा दलाने सुखरुप तिच्या सहकारी सेवकांपर्यंत पोहोचविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.
मीरा मिर्झा बागडी (५३) रा. मजरमला, लालकणा, पाकिस्तान ही महिला पाकिस्तानच्या सिंधी बागडी समाजाच्या ४० सेवकांसोबत सदाकी दरबार संस्था रायपूर येथे झुलेलाल भगवानच्या कार्यक्रमासाठी आली होती. रायपूरवरुन नागपुरात आल्यानंतर दुसरी रेल्वेगाडी पकडून त्यांना अमरावतीला जायचे होते. परंतु चुकामुकीत या महिलेसोबतचे सर्व सेवक निघून गेले. ती प्लॅटफार्म क्रमांक १ वर रडताना आरपीएफचे उपनिरीक्षक भुरासिंह बघेल, जवान संजय खंडारे यांना दिसली. त्यांनी या महिलेची विचारपूस केली असता तिला उर्दू आणि दुसरी भाषा येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या घटनेची सूचना वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना देण्यात आली. बाहेरुन उर्दू बोलणाऱ्या व्यक्तीला पाचारण केल्यानंतर या महिलेने आपबिती सांगितली. त्यानंतर पवन बत्रा (३४) रा. जरीपटका हे आरपीएफ ठाण्यात आले. त्यांनी या महिलेसोबत सिंधी भाषेत संवाद साधून संबंधित ग्रुपच्या कार्यालयात संपर्क केला. कागदपत्रांची पुष्टी केल्यानंतर या महिलेला पवन बत्रा यांच्या सुपूर्द करण्यात आले. आरपीएफने केलेल्या सहकार्याबद्दल संबंधित महिलेने आरपीएफचे आभार मानले.