विद्यापीठाच्या वित्त विभागाला सुरुंग
By admin | Published: February 25, 2016 02:43 AM2016-02-25T02:43:40+5:302016-02-25T02:43:40+5:30
यवतमाळच्या कॅनरा बँकेत बनावट खाते उघडून विद्यापीठाला ३१ लाख रुपयांनी गंडा घालण्यात आला आहे.
आणखी दोन चेक पळविले ४ कंत्राटदाराचे बनावट अकाऊंट ४गॅम्बलरचा नागपुरातही यवतमाळ पॅटर्न
जितेंद्र ढवळे / योगेश पांडे नागपूर
यवतमाळच्या कॅनरा बँकेत बनावट खाते उघडून विद्यापीठाला ३१ लाख रुपयांनी गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. असे असतानाच विद्यापीठाच्या वित्त विभागातून एका कंत्राटदाराच्या अनामत ठेवीचे दोन धनादेश पळविण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. इतकेच काय तर धनादेश पळविणाऱ्याने बनावट खाते तयार करून दोन लाख सात हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे फूलप्रूफ असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागाला सुरुंग तर लागला नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. सध्या याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.
विद्यापीठातील एका खासगी कामासाठी नागपुरातील रूपेश लीलाधर रणदिवे यांनी निविदा दाखल केली होती. यासाठी त्यांनी विद्यापीठाच्या वित्त विभागाकडे २ लाख ७ हजार ९५६ रुपयांची अनामत रक्कम (धनादेश) जमा केला होता. मात्र काम मिळाले नसल्याने त्यांनी अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी वित्त व लेखा विभागाकडे १० दिवसांपूर्वी मागणी केली. मात्र धनादेश अद्याप तयार झाला नसल्याचे त्यांना वित्त विभागाकडून सांगण्यात आले. रणदिवे यांनी पुन्हा यासंदर्भात वित्त व लेखा विभागाकडे चौकशी केली असता तुमचा धनादेश कोणीतरी घेऊन गेले, असे सांगण्यात आले. मात्र यात काही तरी गोलमाल असल्याचे लक्षात आल्यावर रणदिवे यांनी यासंदर्भात खोलात जाऊन चौकशी केली. तर त्यांच्या नावाने धरमपेठ येथील शामराव विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बँकेत एका खात्यातून विद्यापीठाचे धनादेश वटविण्यात आल्याची माहिती त्यांना वित्त विभागातून मिळाली. याची खातरजमा करण्यासाठी रूपेश लीलाधरराव रणदिवे यांनी तातडीने विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकाकडे धाव घेतली.
येथे त्यांना रूपेश लक्ष्मण रणदिवे या नावाने खाते असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळतात रणदिवे यांना शॉक बसला आणि त्यांनी यासंदर्भात वित्त व लेखा विभागाकडे चौकशी केली. यात त्यांच्या नावाने (रूपेश एल. रणदिवे) असलेला धनादेश वटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यवतमाळ आणि नागपुरातील या दोन्ही घटना पाहता बनावट खाते आणि बनावट चेक तयार करीत विद्यापीठाला गंडा घालण्याच्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाची कार्यपद्धत माहीत असलेल्या व्यक्तीकडूनच हे काम केले जात असल्याची माहिती आहे. आणखी अशी काही प्रकरणे येत्या काळात पुढे येण्याची दाट शक्यता वित्त विभागातील एका प्रामाणिक कर्मचाऱ्याने लोकमतला दिली.
पोलिसांत तक्रार करणार
नागपूर : यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी घटना घडली असल्याचे मान्य केले. हा प्रकारदेखील धक्कादायक आहे. याबाबत रणदिवे यांनी विद्यापीठाकडे लेखी तक्रार दिलेली आहे. बुधवारी ३१ लाखांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अधिकारी व्यस्त होते. त्यामुळे हे दोन धनादेश गायब होण्याच्या प्रकरणात गुरुवारी पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल. पोलिसांत तर याबाबत निश्चितच तक्रार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)