मुक्या जीवाचा कैवारी

By Admin | Published: February 2, 2016 02:49 AM2016-02-02T02:49:07+5:302016-02-02T02:49:07+5:30

या सृष्टीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. परंतु मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे अनेक जीवांचे आयुष्य पूर्ण होण्यापूर्वीच त्याची कत्तल करून नष्ट करण्यात येते.

Wrestling champion | मुक्या जीवाचा कैवारी

मुक्या जीवाचा कैवारी

googlenewsNext

जीवदानाचे अनोखे कार्य : प्राण्यांच्या सान्निध्यात शोधतो जगण्याचे समाधान
मंगेश व्यवहारे  नागपूर
या सृष्टीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. परंतु मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे अनेक जीवांचे आयुष्य पूर्ण होण्यापूर्वीच त्याची कत्तल करून नष्ट करण्यात येते. स्वार्थापोटी काही जीवांची उपयोगिता संपल्यानंतर त्याला कसायाच्या हवाली करण्यात येते. अशा जीवांचे रक्षण करून, त्यांच्या वेदनांना मायेची फुंकर घालण्याचे कार्य बिडगाव येथे मुन्ना शुक्ला करीत आहे. बिडगावच्या कत्तलखान्यासमोर स्वत:ची गोशाळा उभारून जीवदानाचे पुण्यकार्य त्यांच्या हातून घडत आहे. निव्वळ गायीच नाही, तर सर्व पाळीव पशू त्यांच्या गोशाळेत निर्धास्त श्वास घेत आहेत. येथील प्रत्येक जीवाची स्वतंत्र कहाणी असून, मुन्ना त्यांच्या संगतीत जगण्याचा आनंद लुटतो आहे.
विशेष म्हणजे मुक्या प्राण्यांसाठी हा माणूस राजकारण सोडून गोपालक झाला आहे. त्यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्य केले आहे. सर्वसामान्यांचे जीवन जगत असणारे मुन्ना शुक्ला यांना एक दृष्टांत घडला. यानंतर त्यांनी आपल्या जगण्याची परिभाषाच बदलली. गोरक्षण-गोसंवर्धनाच्या कार्यात त्यांची रुची वाढली. कन्नुभाई सावडिया यांच्या सानिध्यात ते आले. अहिंसा परमो धर्म या मार्गावर त्यांनी जीवरक्षणाचे कार्य सुरू केले. या प्रेरणेतूनच त्यांनी बिडगावच्या कत्तलखान्यासमोर गोशाळा सुरू केली. पोलीस कारवाईत सापडलेल्या जनावरांच्या पालन पोषणाचे कार्य ते करीत आहे. त्यांच्याकडे आज ११३ गायी, बैल व वासरे आहे. ५९ रेडे, ८ बकऱ्या, ९ ससे, १ घोडा या गोशाळेत आहेत. महिनाभरापूर्वी यशोधरा पोलीस ठाण्यांतर्गत १७ रेडे कत्तलखान्याकडे जात असताना पोलिसांनी पकडले होते. याची माहिती मुन्ना शुक्ला यांना मिळाली. त्यांनी ही जनावरे गोशाळेत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु काही लोकांच्या जमावाने त्यांना विरोध केला. सत्र न्यायालयाने ही जनावरे कोंडवाड्यामध्ये पाठविण्याचे आदेश दिले. मात्र मुन्ना शुक्ला यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात चॅलेंज केले. न्यायालयाने आदेशाला स्थगिती दिल्यानंतर १७ रेडे त्यांनी आपल्या गोशाळेत आणले. त्यांच्याकडे असलेला सुलतान नावाच्या घोड्याला म्हातारा झाल्यामुळे त्याच्या मालकाने विकायला काढले होते. घोड्याचा कंबरेपासून पाय निकामी झाले असताना, मुन्ना यांनी त्याला विकत घेतले. स्वत: विकत घेतलेली, कसायाच्या तावडीतून सोडविलेली, रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली जनावरे त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा आहेत.
निसर्गाने त्यांना जीवन दिले आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यूही नैसर्गिक होईल या भावनेतून त्यांची सेवा शुक्ला करीत आहे. प्राण्यांच्या आरोग्यापासून, त्यांचे खानपान ते स्वत: करतात. बहुतांश प्राण्यांना त्यांनी नाव दिले आहे. प्र्राण्यांवर इतके प्रेम की आवाज दिल्यावर शेपटी हालवित त्यांच्याजवळ येतात. गोकुळच त्यांच्या येथे नांदत आहे. या जीवांची सेवा करताना, रक्षण करताना पैशाची पर्वा ते करीत नाही. कसायांशी त्यांचा छत्तीसचा आकडा आहे. परंतु कुणाचीही मदत न घेता अगदी बिनधास्तपणे ते कार्य करीत आहे. कसायाच्या हाताने मृत्यू लिहिला असेल तर घाबरायचे कशाला. जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंत जीवरक्षणाचे कार्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

हे पुण्यकर्मच
मुक्या जीवांच्या वेदनांना जेव्हा मायेचा ओलावा लाभतो. तेव्हा मानवापेक्षाही हे पशू जास्त भावनिक होतात. आपल्याला जीव लावतात. असेच काहीसे नाते माझे आणि या प्राण्यांमध्ये झाले आहे. त्यातूनच एक नवीन ऊर्जा मिळत आहे. या जीवांच्या पालनपोषणातून मला पुण्यकर्मच मिळत आहे.
-मुन्ना शुक्ला, अध्यक्ष, राधाकृष्ण साईधाम गोशाळा

Web Title: Wrestling champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.