काही वकिलांच्या बेशिस्तीमुळे समाजात चुकीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:10+5:302021-06-25T04:07:10+5:30
नागपूर : काेरोना संक्रमणामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ऑनलाईन कामकाज केले जात आहे. दरम्यान, वकिलांनी न्यायालयासमक्ष हजर होताना ...
नागपूर : काेरोना संक्रमणामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ऑनलाईन कामकाज केले जात आहे. दरम्यान, वकिलांनी न्यायालयासमक्ष हजर होताना शिष्टाचार व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही वकील बेशिस्तपणे वागले. एका प्रकरणात वकिलाने साध्या वस्त्रांमध्ये न्यायालयासमक्ष हजेरी लावली तर, अन्य एका प्रकरणात महिला वकील न्यायालयासमक्ष युक्तिवाद करताना कारमध्ये बसून होत्या. वकिलांनी शिष्टाचार व नियमांची पायमल्ली करण्याच्या अशा अनेक घटना ऑनलाईन सुनावणीदरम्यान घडल्या. यासंदर्भात बार कौन्सिल व बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली असता, त्यांनी संबंधित वकिलांच्या बेशिस्तीमुळे समाजात चुकीचा संदेश गेला असे मत व्यक्त केले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे अध्यक्ष ॲड. अनिल गोवारदीपे यांनी वकिलांच्या बेशिस्तीवर नाराजी व्यक्त केली. सर्व वकिलांनी न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे. वकिलांसाठी गणवेश ठरवून देण्यात आला आहे. न्यायालयात युक्तिवादाकरिता हजर होताना गणवेश घालणे बंधनकारक आहे. तसेच, शिष्टाचाराचेही पालन केले पाहिजे. त्यात कसूर करणाऱ्या वकिलांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. न्यायालयाने अशी प्रकरणे कौन्सिलकडे पाठवल्यास कायदेशीर पाऊल उचलले जाईल असे त्यांनी सांगितले.
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे उपाध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनीही खंत व्यक्त केली. वकिलांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान शिस्त पाळणे गरजेचे आहे. वकिलांनी ऑनलाईन सुनावणीतही गणवेश घातला पाहिजे. बंद खोलीमध्ये बसून युक्तिवाद केला पाहिजे. बेशिस्तपणे वागलेल्या वकिलांशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. तसेच, यापुढे अशी चूक न करण्याची समज दिली, असे त्यांनी सांगितले.
नागपूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कमल सतुजा यांनी वकिलांनी बेशिस्तपणे वागायला नको, अशी भूमिका मांडली. वकील हा समाजातील जबाबदार घटक आहे. वकिलांनीच नियमांचे पालन न केल्यास समाजात चांगला संदेश जाणार नाही. उच्च न्यायालयाने बेशिस्त वकिलांना फटकारल्यामुळे इतर वकिलांना धडा मिळाला आहे. त्यामुळे यापुढे सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.