नगरसेवकांना न भेटण्याची आयुक्तांची भूमिका चुकीची : महापौर संदीप जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 09:14 PM2020-02-01T21:14:32+5:302020-02-01T21:16:16+5:30
नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व आमची कार्यशैली वेगवेगळी आहे. पदाधिकारी आणि प्रशासन एका गाडीची चाके आहेत. नगरसेवक प्रभागातील ६० हजार लोकांचे प्रतिनिधी आहेत. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली.
सभागृहाच्या माध्यमातून महापौर शहर विकासाचे व नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. त्याची अंमलबजावणी आयुक्त करतात. शहरातील नागरिकांच्या समस्या व तक्रारी तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी झोन स्तरावर जनता दरबार सुरू केले. परंतु काही प्रकरणे न्यायालयात तर काही नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहेत. अतिरिक्त बांधकामाच्या काही प्रकरणात कम्पाऊं डिंग शुल्कासाठी नगररचना विभागाकडे अर्ज केले आहेत. एकाच प्रकरणाच्या अनेक तक्रारी आहेत. आयुक्त सुद्धा जनता दरबाराच्या माध्यमातून लोक ांच्या समस्या सोडवित असतील तर आनंदच असल्याची प्रतिक्रीया संदीप जोशी यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
शहरातील अतिक्रमणाला आळा बसावा यासाठी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. यासमितीनी केलेल्या शिफारशीनुसार नवीन नियम तयार करण्यात आले आहे. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात आहे. यात दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आठवडी बाजाराला शिस्त लावली जाणार आहे. शहरातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी रस्त्यावरील व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्त कारवाई करीत आहेत. आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा फोन आला होता. मी महापालिका मुख्यालयात नव्हतो. ते सोमवारी भेटणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.
महापौर जनता दरबारांना चांगला प्रतिसाद
झोन स्तरावर महापौर जनता दरबारांचे आयोजन केले जात आहे. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर आदी झोनमधील जनता दरबारला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आलेल्या नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.