राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ...

By नरेश डोंगरे | Published: December 4, 2023 09:20 PM2023-12-04T21:20:22+5:302023-12-04T21:20:32+5:30

बॅगमध्ये स्फोटके असल्याचे श्वानाकडून संकेत : रेल्वे स्थानकावर तासभर तणाव

Wrong side speeding car, three terrorists and thrill | राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ...

राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ...

नागपूर: बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील प्रिन्स तसेच मार्शल नामक श्वान वेटिंग हॉलमधील एका तरुणाजवळच्या बॅगमध्ये स्फोटके असल्याचे संकेत देतात अन् रेल्वे पोलीस, दहशतवादी विरोधी पथक (एटीएस), शिघ्र कृती दल (क्यूआरटी) आणि बॉम्ब शोधक तसेच नाशक पथक तातडीने ती बॅग ताब्यात घेते. रेल्वे स्थानकापासून दूर अंतरावर नेऊन स्फोटके निष्क्रीय करण्यात आल्याचा तासाभरानंतर निरोप येतो अन् सारे काही ठिकठाक असल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, कथित दहशतवाद्यांचे अटकनाट्य पार पडल्याचे कळाल्याने तासाभरापासून प्रचंड तणावात असलेले रेल्वे स्थानकावरील प्रवाशी सुटकेचा निश्वास टाकतात.

घटना आहे मुख्य रेल्वे स्थानकावरची आज सोमवारी सायंकाळी ५ वाजताची. हल्दीराम रेस्टॉरेंटकडून एक गाडी वेगात रेल्वे स्थानकात शिरते. अलर्ट असलेला पोलीस अंमलदार प्रसंगावधान राखत ती रोखतो. बाजुच्या सहकाऱ्यांना बोलवून घेतो. आतमध्ये दोन स्कार्फ बांधलेले तरुण आढळतात. पोलीस त्यांना ताब्यात घेतात. ते दहशतवादी असल्याचे आणि रेल्वे स्थानकावर घातपात घडविण्याच्या उद्देशाने त्यांचा एक साथीदार स्फोटकांची बॅग घेऊन वेटिंग हॉलमध्ये शिरल्याचे त्या दोघांकडून पोलिसांना कळते. त्यानुसार, रेल्वे पोलीस (जीआरपी), एटीएस, क्यूआरटी, बीडीडीएस तसेच तब्बल १२ अधिकारी आणि ५९ कर्मचारी, बीडीडीएसचे पाच श्वान सशस्त्र पोलिसांसह रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वरील ओपन वेटींग हॅालकडे धावतात. तेथून एका संशयीताला ताब्यात घेण्यात येते.

त्याच्याजवळ असलेल्या बॅगची बीडीडीएसचे श्वान तपासणी करून त्यात स्फोटके असल्याचे संकेत देतात. त्यानंतर त्या कथित दहशतवाद्याला जेरबंद करून त्याच्याजवळची कथित स्फोटकांची बॅग रेल्वे स्थानकावरून दूर अंतरावर तपासणीसाठी नेली जाते. त्यातील स्फोटके निष्क्रीय करण्यात आल्याचा निरोप सायंकाळी ६ वाजता रेल्वे पोलिसांना बीडीडीएसकडून दिला जातो. त्यानंतर रेल्वे स्थानकावरून त्यांची पांगापांग होते. दरम्यान, सायंकाळी ५. ५ ते ६.५ या तासाभराच्या कालावधीत तणावात असलेल्या प्रवाशांकडून विचारणा सुरू होते. ताब्यात घेण्यात आलेले ते तीन दहशतवादी कोण, त्यांच्याजवळची स्फोटके कोणती, त्यावर त्यांना 'दहशतवादी हल्ल्याची ही मॉक ड्रील' असल्याचे जीआरपीकडून सांगण्यात येते अन् ते ऐकून प्रवाशांचा जीव भांड्यात पडतो.

अचानक दहशतवादी हल्ला झाला तर...?
महापरिनिर्वाण दिन आणि उपराजधानीत होणारे हिवाळी अधिवेशन या निमित्ताने दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावर अचानक दहशतवादी हल्ला झाला तर तुमची (रेल्वे पोलिसांची) काय तयारी आहे, तो तुम्ही कसा उधळून लावणार, हे तपासण्यासाठी नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर रंगीत तालिम (मॉक ड्रील) घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार जीआरपीच्या निरीक्षक मनीषा काशिद यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी कथित दहशतवादी हल्ल्याची मॉक ड्रील घेण्यात आली. यावेळी काय चुका, उणिवा राहिल्या, त्यासुद्धा संबंधितांकडून अधोरेखित करण्यात आल्या.

Web Title: Wrong side speeding car, three terrorists and thrill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.