कोविडच्या उपचारात ‘एक्स-रे’चे महत्त्व अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:25 AM2020-12-13T04:25:43+5:302020-12-13T04:25:43+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच अनेक डॉक्टर रुग्णांना ‘हाय रिझोल्यूशन’ सिटी स्कॅन करण्यास सांगतात. परंतु गावखेड्यात ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच अनेक डॉक्टर रुग्णांना ‘हाय रिझोल्यूशन’ सिटी स्कॅन करण्यास सांगतात. परंतु गावखेड्यात सिटी स्कॅन असतोच असे नाही. यामुळे सामान्य ‘एक्स-रे’मधूनही कोविड बाधितांवर अचूक उपचार केला जाऊ शकतो. शिवाय, सिटी स्कॅनच्या तुलनेत ‘एक्स-रे’ हा अधिक सुरक्षित, कमी खर्चिक व अचूक निदान करणारा आहे, असे एक हजार रुग्णांवर केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. रमेश पराते यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन करण्यात आले. यात रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. आरती आनंद, मेयोच्या मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते व डॉ. श्रेया तिवारी यांचाही सहभाग होता. डॉ. पराते यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या एक हजार रुग्णांच्या ‘एक्स-रे’चा अभ्यास करण्यात आला. यात ३८९ महिला व ६११ पुरुषांचा समावेश होता. २० वर्षाखालील वयोगटात ६८, ३० ते ४० वयोगटातील ३४४, ४१ ते ६० वयोगटात ३७२, ६१ ते ८० वयोगटात २०२ तर ८१ वरील वयोगटात १४ रुग्ण सहभागी होते. यांच्यापैकी ५७७ रुग्णांत लक्षणे होती तर ४२३ रुग्णांत लक्षणे नव्हती. या सर्वांच्या ‘एक्स-रे’चा अभ्यास केल्यानंतर कोविडच्या उपचारात ‘एक्स-रे’चे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.
- छातीच्या ‘एक्स-रे’मधूनही कोविड रुग्णांवर औषधोपचार
कोविडबाधित रुग्णांच्या छातीचा ‘एक्स-रे’वरून रुग्णाचा निमोनिआच्या निदानापासून तर त्याला कुठल्या टप्प्यात कोणता औषधोपचार द्यायला हवा, प्लाझ्मा थेरपी कधी द्यायला हवी, कधी ‘एनआयव्ही’वर रुग्ण ठेवावा याचे निदान करता येऊ शकते. यावरून ‘एक्स-रे’चे महत्त्व सिद्ध होते, असे डॉ. पराते म्हणाले.
-२५० ‘एक्स-रे’चे रेडिएशन एका सिटी स्कॅनमध्ये
‘एक्स-रे हा गावखेड्यातही उपलब्ध असतो. सिटी स्कॅनच्या तुलनेत तो फार स्वस्त असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २५० ‘एक्स-रे’चे रेडिएशन एकाच सिटी स्कॅनमध्ये असते. यामुळे रुग्णांचे चारपेक्षा जास्त सिटी स्कॅन केल्यास समस्या निर्माण होते. तिथे गरजेनुसार एक्स-रे काढता येतो. सिटी स्कॅन झाल्यानंतर संबंधित खोलीचे सॅनिटायझेशन करावे लागते. सिटी स्कॅन करायला चारपेक्षा जास्त मनुष्यबळाची गरज पडते. यामुळे कोविड उपचारात ‘एक्स-रे’चे योगदान मोलाचे ठरते. परंतु जिथे उपचारानंतरही रुग्णांची प्रकृती सुधारत नसेल त्या स्थितीत ‘सिटी स्कॅन’ आवश्यक ठरते.
-कोविड उपचारात ‘एक्स-रे’ वरदानाच()
कोविडबाधितांच्या उपचारात ‘एक्स-रे’ वरदानाच ठरत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन ‘इंडियन जनरल ऑफ अप्लाईड रेडिओलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. एक हजार रुग्णांचा सहभाग असलेले अलिकडच्या काळातील हे मोठे संशोधन असावे. याचा फायदा विशेषत: गावखेड्यात जिथे सिटी स्कॅन उपलब्ध नाही, तेथील डॉक्टरांना होऊ शकतो.
-डॉ. रमेश पराते
प्राध्यापक, रेडिओलॉजी विभाग, मेडिकल