५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा; हिवाळी अधिवेशनात कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 09:22 PM2022-12-15T21:22:53+5:302022-12-15T21:23:58+5:30

हिवाळी अधिवेशनादरम्यान ५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागणार आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक आमदारांचा समावेश आहे.

'X' to 'Z Plus' security to 54 Ministers-MPs; Tight security during the winter session | ५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा; हिवाळी अधिवेशनात कडेकोट बंदोबस्त

५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा; हिवाळी अधिवेशनात कडेकोट बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्दे ८ हजार पोलीस-होमगार्ड राहणार तैनात, फोर्सवनचे कमांडोदेखील दाखल

नागपूर : तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारसोबतच सुरक्षा यंत्रणांचीदेखील परीक्षा राहणार आहे. अधिवेशनादरम्यान ५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागणार आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येत आहे.

राज्यात सत्ताबदलानंतर शिंदे गटाच्या ४० आमदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. अधिवेशनादरम्यानदेखील या आमदारांना ही सुरक्षा असेल व त्यांच्यासोबत एस्कॉर्ट वाहन असेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था राहणार आहे; तर आदित्य ठाकरे यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था असेल. चार आमदार-मंत्र्यांना ‘वाय’ सुरक्षाव्यवस्था, तर पाचजणांना ‘एक्स’ सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येईल.

बाहेरून अडीच हजार अधिकारी-कर्मचारी नागपुरात

अधिवेशनकाळात सुरक्षेसाठी जिल्ह्याबाहेरून अडीच हजार अधिकारी व कर्मचारी बोलाविण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत एकूण सात हजार पोलिस कर्मचारी-अधिकारी असतील. यात ६३२ महिलांचा समावेश आहे. तर होमगार्डचे हजार जवान तैनात राहतील. याशिवाय एसआरपीएफच्या सात कंपन्या, फोर्स वनचे जवानदेखील सुरक्षा व्यवस्थेचा मोर्चा सांभाळतील. विधानभवन, मोर्चाचे ठिकाण, मंत्री-आमदारांचे कार्यालय-निवास यांसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशन काळात मंत्री-आमदारांच्या सुरक्षेसोबतच शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरदेखील ‘वॉच’ असेल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

१० ठिकाणी निवासाची व्यवस्था

अडीच हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी बाहेरून आले आहेत. महिला पोलिसांच्या राहण्याची सोय लकडगंज येथील पोलिस क्वार्टर्समध्ये करण्यात आली आहे. तर इतर पोलिसांची सोय शहरातील १० मंगल कार्यालये व इतर ठिकाणी करण्यात आली आहे. पोलिसांच्या भोजनव्यवस्थेसाठी सहा कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे.

अशी असेल सुरक्षा व्यवस्था

- एकूण पोलिस जवान : सात हजार

- होमगार्डचे जवान : एक हजार

- एसआरपीएफ : ७ कंपन्या

- फोर्स वनचे जवान

- बीडीडीएस : १२ पथके

- वाहने : ६११

- सर्व्हेलन्स व्हॅन : पाच

- ड्रोन : पाच

आतापर्यंत ६३ मोर्चांना परवानगी

विधिमंडळावर मोर्चे काढण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून आतापर्यंत ६३ अर्जांना परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यातच ४१ मोर्चे निघणार आहेत. याशिवाय २० धरणे व तीन साखळी उपोषणांना परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: 'X' to 'Z Plus' security to 54 Ministers-MPs; Tight security during the winter session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.