फेलाेशीपच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकांच्या झेराॅक्स, तिसऱ्यांदा पेपरफुटी; बार्टी, सारथी, महाज्याेतिचा भाेंगळ कारभार
By निशांत वानखेडे | Published: January 10, 2024 03:16 PM2024-01-10T15:16:12+5:302024-01-10T15:16:35+5:30
पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संताप
नागपूर : बार्टी, महाज्याेती व सारथीच्या अधिछात्रवृत्तीसाठी झालेल्या संयुक्त परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना चक्क झेराॅक्स काढलेल्या व सील नसलेल्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. नागपूरसह पुणे, औरंगाबाद, काेल्हापूर या चारही केंद्रावर हा पेपरफुटीचा गैरप्रकार झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंताेष पसरला. नागपुरात बुधवारी परीक्षा केंद्राबाहेर परीक्षार्थिंनी तीव्र असंताेष व्यक्त करीत परीक्षेवरच बहिष्कार घातला.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) सह महाज्याेती व सारथी या संस्थांद्वारे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फेलाेशीप पात्रतेसाठी बुधवारी संयुक्तपणे परीक्षा घेण्यात आली. नागपूरला कमला नेहरू महाविद्यालयात परीक्षेचे केंद्र हाेते व सकाळी १० वाजताच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेकडाे विद्यार्थी कालपासून नागपुरात दाखल झाले हाेते. सकाळी पेपर सुरू झाल्यावर काही खाेल्यांमध्ये प्रश्नपत्रिकांचा तुटवडा पडला. बऱ्याच परीक्षार्थिंना प्रश्नपत्रिकांच्या झेराॅक्स देण्यात आल्या.
या प्रश्नपत्रिकांना सीलसुद्धा लागले नव्हते व साधे स्टॅपल मारून जाेडले हाेते. हा प्रकार पाहुन परीक्षार्थींमध्ये असंताेष पसरला व सर्वच्या सर्व पेपर घेत वर्गाबाहेर पडले व सरकारविराेधात तीव्र घाेषणाबाजी करीत ठिय्या मांडला.
विद्यार्थ्यांचा असंताेष लक्षात येताच डीसीपींच्या नेतृत्वात पाेलिसांचा ताफा तेथे पाेहचला. मात्र परीक्षार्थींचा राेष काही शमला नाही. दरम्यान शिक्षक आमदार अॅड. अभिजित वंजारी यांनी तेथे पाेहचून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांनी महाज्याेतिचे संचालक राजेश खवले तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. गाेसावी यांच्याशीही चर्चा केली. परीक्षार्थिंनी जवळपास साडेतीन तास केंद्रावरच ठिय्या मांडला व त्यानंतर नागपुरातील महाज्याेतीच्या कार्यालयावर माेर्चा काढला.
दुसऱ्यांदा परीक्षेत गाेंधळ
बार्टी, सारथी आणि महाज्योतीने या फेलोशिपसाठी २४ डिसेंबर २०२३ राेजी राज्यभर चाळणी परीक्षा घेतली हाेती. मात्र, २०१९ च्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका पुन्हा २०२३ च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे २०१९ मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, तोच पेपर २०२३ च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला होता. त्यामुळे हा पेपरही रद्द करण्यात आला. आता पुन्हा परीक्षार्थिंना परीक्षेचा ससेमिरा सहन करावा लागला व त्यातही गाेंधळ निर्माण झाला.
चाळणी परीक्षेचे थाेतांड कशासाठी?
प्रचलित पद्धतीनुसार विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेद्वारे पीएच.डी.साठीचे प्रवेश दिले जातात किंवा पीजीनंतर नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत देऊन, पीएच. डी.ला प्रवेश मिळवता येताे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम किमान ७५ टक्के गुणांसह किंवा पदवीनंतर एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पीएच. डी.ला प्रवेश घेता येताे, असा नियम २०२२ मध्ये युजीसीने केला आहे.
नेट, सेट या परीक्षा पात्र झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी पात्र ठरविले जातात. त्यानंतर पात्र संशोधक विद्यार्थ्यांच्या मुलाखतीनंतर संशोधन अहवाल मागवण्यात येतो व तो अहवाल विद्यापीठाच्या स्क्रुटिनाईज कमिटीकडे पाठवण्यात येतो व या कमिटीच्या मान्यतेनंतरच संशोधक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होते. एवढी पात्रता सिद्ध केल्यानंतर पुन्हा बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांना चाळणी परीक्षा घेण्याची गरज काय, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला.